आमच्या जीवाला धोका आहे - क्रांती रेडकर


मुंबई 

तुम्हाला जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. आमच्या जीवाला धोका आहे, असे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रसार माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

क्रांती रेडकरने पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दलचीही माहिती दिली. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. ट्रोल केले जाते. लटकवून टाकू, जाळून टाकू अशा धमक्या आम्हाला येत आहेत. मात्र समीर यांच्या जॉबबद्दल हे पार्ट अँड पार्सल आहे असे वाटते, असे क्रांतीने सांगितले. आमच्या जीवाला धोका आहे. आम्हाला संरक्षण दिले आहे. त्यामुळे सरकारचे आभारी आहोत, असे सांगताना फेक अकाऊंटवरून आम्हाला धमकी दिली जात आहे. तुमची परेड करू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढले असून वेळ आल्यानंतर ते जाहीर करू, असेही तिने सांगितले. वानखेडे या प्रकरणातून बाहेर पडणारच असे सांगत, नवाब मलिकांना उत्तर देईन. अजूनही कटकारस्थान केले जातील. अनेक कागदपत्रे तयार केली जातील पण ती गोष्ट सिद्ध करणे सर्वात मोठी गोष्ट आहे. ते हे सिद्धच करू शकणार नाही. कारण हे सर्व खोटे असल्याचे सांगितले. समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपामुळे त्रास होतोय, असेही तिने सांगितले. कोणीही उठून धमक्या देतंय. मला इतर राज्यातून सपोर्टचे फोन येत आहेत. आपल्या राज्यातूनही समर्थनाचे मेसेज येत आहेत पण मला राज्यात घाबरवले जाते. पोलिसांनी मला सुरक्षा दिली आहे पण समीर वानखेडेंचे विरोधक आम्हाला त्रास देत आहेत, असे तिने सांगितले. महाराष्ट्र सरकार समजदार आहे. जेव्हा सत्य कळेल तेव्हा सरकार वानखेडेंच्या बाजूनेच उभी राहिल अशी खात्री असल्याचे तिने सांगितले. तसेच समीर केवळ कलाकारांना पकडत नाही. शंभर टक्क्यातून तीन टक्के लोक कलाकार असतील. ते डॉन किंवा ड्रग्ज पेडलर यांना पकडत असतात. त्यामुळे ते पर्सनल राग काढत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. ते केंद्र सरकारच्या एजन्सीसोबत काम करत आहेत. मात्र ते कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत, असेही तिने सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या