मुंबई
आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घोटाळा समोर आणणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या घोटाळ्याचे गुरु असल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
सध्या घोटाळ्यांची हजारो पानांची यादी गोळा करून बसलेले सोमय्या सर्वत्र चर्चेत आलेत. रोज एका नव्या नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या सोमय्यांनी दिवाळीनंतर नव्या मुहूर्तावर निश्चितपणे या चाळीस चोरांपैकी आणखी एका चोराच्या भ्रष्टाचाराचे कागदपत्र जनतेसमोर ठेवणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुरु असल्याचा आरो[प केला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी आपल्या यादीत सामील केले आहे. कधी हिरेनला मारण्याची तर कधी आर्यन खानला वाचवण्याची सुपारी दिल्याचा आरोप सोमय्या यांनी त्यांच्यावर केला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पकडला गेला आहे. कोर्टाने त्याला जेलमध्ये पाठवले आहे. तर दहा दिवस यांचे रोज हलका गांजा, हर्बल गांजा हेच चालू आहे, असा सरकारवर हल्ला करताना ठाकरे-पवार आणि या सरकारने ड्रग्ज माफियांकडून सुपारी घेतली आहे का?असा सवाल उपस्थित केला आहे. मनसुख हिरेनला मारण्याची सुपारी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी नियुक्त केलेले गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त परमबीर सिंह, शिवसेनेचे उमेदवार प्रदिप शर्मा आणि सचिन वाझेंनी घेतली होती, असा आरोप सोमय्या यांनी केला. या सुपारीबाज लोकांवर कारवाई होणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या