ट्रक पलटी : ग्रामस्थांनी पळवल्या दारूच्या बाटल्या


बारामती

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे (दि:२९) रोजी दारू घेऊन जाणारा ट्रक पहाटे पलटी झाला. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दारूचा ट्रक पलटी झाल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी एकच गर्दी पहिला मिळाली.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पिंपळी येथील मद्य निर्मिती करणाऱ्या प्रकल्पातून दारूचे भरलेले बॉक्स घेऊन (एम एच १२ एफ सी ६१५०) हा ट्रक जळगावकडे निघाला होता. यामध्ये जवळपास ६५ लाख रुपये किंमतीचे ९५० दारूचे बॉक्स भरण्यात आले होते. मात्र पहाटेच्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला.

उंडवडी कडेपठार येथील एका ढाब्यासमोर ही घटना घडली. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, दारूचा ट्रक पलटी झाल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी एकच गर्दी करत संधी साधून घेतली. अनेकांनी पिशवी भरून दारूच्या बाटल्या नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बारामती तालुका पोलिसांनी या घटनेची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली.  त्यामुळे दारू नेण्यासाठी झालेली ग्रामस्थांची गर्दी काही प्रमाणात पांगली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या