हलगर्जी, निष्काळजीपणाचे 11 बळी!

 नगर जिल्हा रुग्णालयात 'ते' होरपळून, गुदमरून गेले


नगर 

काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील आणि आता अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग वॉर्डात शनिवारी आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूनंतर कातडीबाचावू भूमिका घेणाऱ्या रुग्णालय प्रशासनाचे पितळ शवविच्छेदन अहवालाने उघडे पडले. या अहवालानुसार, ११ पैकी सहा जणांचा मृत्यू गुदमरून तर तिघांचा होरपळून, एकाचा ६० टक्के भाजल्यामुळे मृत्यू झाला आहे. तसेच एका रुग्णाच्या मृत्यचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने व्हीसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

आगप्रकरणी पोलिसांनी स्वत:च फिर्याद देत अज्ञात व्यक्तींविरूद्ध सदोष मनुष्य वधाचा (कलम ३०४ अ) गुन्हा दाखल केला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर अहमद मुजावर यांनी ही फिर्याद दिली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. सरकारने चौकशी समिती नेमली असली तरी पोलिस याचा स्वतंत्रपणे तपास करून आरोपी निष्पन्न करणार आहेत. या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या देखरेखीखाली करण्याच्या सूचना पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिल्या आहेत. आग प्रकरणाची चौकशी आणि पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी शवविच्छेदन अहवाल महत्वाचा ठरणार आहे. आग लागलेल्या कक्षात १७ रुग्ण होते. त्यातील सहा जणांना अन्यत्र हलवण्यात यश आले असून त्यांचा जीव वाचला आहे. मात्र, या घटनेत केवळ ऑक्सिजन बंद पडल्याने नव्हे तर भाजल्यानेही मृत्यू झाल्याचे पुढे आल्याने आगीची भीषणता लक्षात येते. या अहवालाच्या आधारे तपासाची आणि चौकशीची पुढील दिशा स्पष्ट होईल.

ही आग कशी लागली आणि रुग्णांचे मृत्यू कसे झाले, यासंबंधी सुरुवातीला वेगवेगळी माहिती पुढे येत होती. त्यानुसार दावे प्रतिदावे आणि राजकीय आरोपही सुरू झाले होते. पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीनेही काम सुरू केले आहे. त्याच दरम्यान मृत्यूचे नेमके कारण पुढे आल्याने तपास आणि चौकशीची दिशा ठरणार आहे. केवळ ऑक्सिजन बंद पडला म्हणून नव्हे किंवा स्थलांतर करताना म्हणून नव्हे तर आगीत भाजल्यानेही मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत असल्याने एकूणच हलगर्जीपणा झाला, हेही स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, आता या प्रकरणी नेमका दोष कोणाचा हे पोलिसांना आणि चौकशी समितीला शोधावे लागणार आहे. त्यानुसार कारवाईसाठी जबाबदारी स्पष्ट केली जाईल.

हलगर्जी अधिकाऱ्यांवर कारवाई  : मुख्यमंत्री

नगर येथील दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त करत याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या दुर्घटनेमुळे राज्यातील दिवाळी सणावर दु:खाचे सावट पसरले आहे. या दुर्घटनेबद्दल स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रूग्णालयाला जबाबदार धरले असून फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप करत हलगर्जीपणाबद्दल संबधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

फायर ऑडिटचे काय झाले?

विशेष म्हणजे चंद्रपूर येथील जिल्हा दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व रूग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर नगरची ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. त्यामुळे राज्य सरकारने आदेश देवूनही योग्य पध्दतीचे फायर ऑडिट करण्यात आले नसल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.

डॉ. सुनील पोखरणा निष्काळजी आणि हेकेखोर : शिवसेना

नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील दुर्घटनेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचा निष्काळजीपणा आणि हेकेखोर वृत्ती कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी पोखरणा यांना दिलेल्या पत्राचा शिवसनेने दाखला दिला आहे. ‘ज्या अतिदक्षता विभागात आग लागली, तेथील सदोष वीज जोडण्यांकडे लक्ष वेधत दुरुस्ती करण्यासंबंधी बांधकाम विभागाचे वीज तांत्रिक अभियंता जगदीश काळे यांनी डॉ. पोखरणा यांना दोन महिन्यांपूर्वीच पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही झाली असती तर ही दुर्घटना टळली असती,’ असा दावा शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे.

कुणी जबाबदारी घेणार की नाही? : फडणवीस

भंडारासह राज्यात रूग्णालयातील आगीच्या अनेक घटना घडूनही सरकारने कोणताही धडा घेतलेला नाही. नगरच्या घटनेत पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, त्यात आग सीलिंगमधून सुरू झालेली दिसते. महापालिकेकडून फायर सेफ्टी प्राप्त नाही. वायरिंगबाबत इलेक्ट्रीकल अभियंत्याने दिलेल्या पत्राकडे दुर्लक्ष, हायड्रेशन आणि स्प्रिंकलर प्रणालीला आर्थिक मंजुरी आरोग्य आयुक्तांकडे काही महिन्यांपासून प्रलंबित असणे, अशी दुरवस्था आहे. त्यामुळे ११ निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. त्यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी. शेवटी कुणी जबाबदारी घेणार की नाही?' 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या