ओहोळ यांची निवड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिशादर्शक


खेड (ता.) प्रतिनिधी  

राजगुरुनगर येथील सचिन आण्णासाहेब ओहोळ या विद्यार्थ्याची युपीएससी द्वारे  भारतीय वनसेवेमध्ये (आयएफएस) श्रेणी-१ अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या सचिन यांनी शालेय जीवनातील सर्व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळविले होते. इयत्ता दहावीमध्ये महात्मा गांधी विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक पटकावणा-या सचिन यांची यापुर्वी केंद्र शासनाच्या अबकारी विभागात निरिक्षक म्हणून निवड झाली होती. परंतु त्यावर समाधान न मानता सचिन यांनी पुन्हा जोमाने तयारी करून वनविभागात श्रेणी-१ चे पद मिळविले. पाबळ येथील विद्यालयात शिक्षक असलेले वडील आण्णासाहेब व गृहिणी मातोश्री मणकर्णा ओहोळ यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे या यशात मोलाचे सहकार्य असल्याने सचिन ओहोळ नम्रपणे सांगतात. 

लहाणपणापासूनच स्पर्धा परीक्षांची आवड, घरातील वडीलधारी माणसांची व शिक्षकांची, पालकांची सतत प्रेरणा, आशिर्वाद तसेच अभ्यासातील सातत्य यामुळे यश मिळाल्याचे सचिन यांनी सांगितले. सचिन यांचे सर्व शिक्षण मराठी माध्यमातील शाळेमधून झालेले असून सध्याच्या मोठमोठ्या शाळेमध्ये भरमसाठ फी भरून त्याच शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या पालकांच्या डोळ्यात सचिन यांचे उदाहरण हे झणझणीत अंजन घालणारे आहे. 

सचिन ओहोळ यांच्या या यशाबद्दल खेड तालुक्यातील तमाम जनतेकडून त्याचे अभिनंदन होत आहे. सचिन यांच्या या यशाबद्दल तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पा., राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष होले, महाराष्ट्र सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे, उद्योजक उमेश मोरे, श्री भैरवनाथ विद्यामंदिर, पाबळचे प्राचार्य अविनाश क्षीरसागर, पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते मुगुटराव मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या