बारावीतील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या


औरंगाबाद 

 शहरातील मोंढा परिसरात राहणाऱ्या एका बारावीच्या तरुणीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. संबंधित मुलगी अभ्यास करण्यासाठी घराच्या दुसर्‍या मजल्यावरील खोलीत गेली होती. तिने अभ्यासाच्या खोलीतच गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभ्यासाच्या ताणातून तिनं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत. सोनाली प्रमोद गवारे असं आत्महत्या करणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचं नाव आहे. पीडित मुलगी जुन्या मोंढ्यातील भवानीनगरमध्ये आईवडिल, भाऊ, आजी आजोबा, काका काकू आणि त्यांची मुलं अशा एकत्रित कुटुंबात राहते. ती शहरातील सरस्वती भुवन विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती. मृत सोनालीचे वडील रिक्षाचालक आहेत. तर आई गृहीणी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी बुधवारी रात्री मृत सोनाली आपल्या कुटुंबासोबत रात्रीचं जेवण केलं. यावेळी तिने हसत खेळत आपल्या कुटुंबासोबत गप्पा मारल्या. यानंतर अभ्यास करायचा  असल्याचं सांगून सोनाली दुसर्‍या मजल्यावर आपल्या खोलीत गेली. काही वेळाने सोनालीच्या भावाला मोबाइल फोन पाहिजे होता, त्यामुळे तो बहिणीकडे वरच्या मजल्यावर गेला. यावेळी त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही आतून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील खोलीकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी दरवाजा तोडला असता, आतमध्ये सोनाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे.  या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या