उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप
जामखेड
निवडणुकीच्या तोंडावर जामखेडमधील पाणी पुरवठा योजना आम्हीच आणली, अशी वल्गना करून काहींनी जनतेला फसविण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात आम्ही पाठपुरावा करून ही पाणी पुरवठा योजना केली. विधानसभा निवडणुकांच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कागद दाखवून पाणी पुरवठा योजनेला 'तत्वतः मंजुरी' दिल्याचे सांगितले. लोकांची दिशाभूल केली. महाविकास आघाडी अशी दिशाभूल करत नाही. मीही अनेक वर्षांपासून मंत्री आहे. तत्त्वतः मंजुरी म्हणजे काय? एक तर मंजूर केले म्हणा किंवा मंजूर करू म्हणा, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली.
जामखेड येथे विविध विकासा कामांचे भूमिपूजन अजित पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अजित पवार बोलत होते. या वेळी आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, कर्जत-जामखेड-श्रीगोंदे असा एक विधानसभा मतदार संघ होता. नंतर श्रीगोंदे मतदार संघ वेगळा झाला. आतापर्यंत या मतदारसंघातील आमदारांनी काय केले यावर मी बोलणार नाही. हा दुष्काळी भाग आहे. येथे पाणी आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला. तुम्ही लोकांनी आमच्या रोहितला मतांचे दान देऊन निवडून आणले आहे. त्याच्यावर विश्वास दाखविला आहे. कोरोनाचा काळ असूनही मागील दोन वर्षांत रोहित पवार यांनी मोठा निधी आणला आहे.
ते पुढे म्हणाले, रस्त्यांमुळे दळणवळण वाढते, त्यातून परिसरातील विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळते. मागील आमदारांच्या काळात दर्जेदार कामे झाली नाहीत. त्यामुळे रोहित पवारांना जनतेने आमदार केले. ते आता विकासाचा अनुशेष भरून काढत आहेत. मंजूर केलेली कामे ही त्या-त्या वेळीच पूर्ण करतात. तुम्ही 10 वर्षे आमदार होता. आता गपगुमान बसा. तुम्हाला लोकांनी का घरी बसविले याचे चिंतन करा. उगाच बदनामी बंद झाली पाहिजे, असा सज्जड दमही त्यांनी भरला.
बारामती, नांदेड अशा ठिकाणांचा विकास का होतो? लोकप्रतिनिधींनी मतदार संघाच्या विकासासाठी निधी आणायचा असतो. आमदार रोहित पवार तसे करत आहेत. एकाच विचाराच्या व्यक्तींकडे सर्वसंस्था द्याव्या लागतात. ग्रामपंचायतपासून खासदारकीपर्यंत सर्व संस्था एकाच विचाराकडे दिल्यास परिसराचा विकास होतो, असेही अजित पवार यांनी सांगितले.
एफआरपी वरून पाचपुते लक्ष्य
नगर जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने दिला नाही एवढा 2800 रुपये प्रतीटन एफआरपी भाव अंबालिका साखर कारखाना देत आहे. करायचे असेल तर समाजाच्या भल्यासाठी काम करा. काही साखर कारखान्यांनी तर मागील दोन हंगामांचे एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आ. बबनराव पाचपुते यांच्यावर निशाणा साधला.
0 टिप्पण्या