शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश

babasaheb purandare

पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले. 

 पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. गेल्या आठ दिवसापासून ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. उपचारादरम्यान काल त्यांची प्रकृती खालावली होती.

शिवाजीमहाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवणाऱ्या, त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा शब्दयज्ञ तब्बल साठहून अधिक वर्षे करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते.

कोरोनाची महामारी सुरू होईपर्यंत व्याख्यानांच्या आणि अन्य कामांच्या निमित्ताने देशा-परदेशात अखंड भ्रमंती सुरू असलेल्या बाबासाहेबांनी महाराष्ट्र, देशासह जगभर लौकिक प्राप्त केला होता.

त्यानिमित्ताने त्यांच्या झालेल्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी उत्साहाने दीड-दीड तास आपले मनोगत व्यक्त केले होते. तसेच दसऱ्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमासही ते प्रमुख पाहुणे होते. मात्र २६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल सायंकाळी त्यांच्या निधनाची अफवा पसरली. त्यावेळी रुग्णालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला होता, तथापि, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या