गडचिरोलीत कोम्बिंग : तेलतुंबडेंसह २६ नक्षली ठार!


गडचिरोली 

कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या मोहिमेत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याचे समजते. या वृत्ताला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

शनिवारी (13 नोव्हेंबर) सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. यात पोलिसांचे तीन जवान गंभीर जखमी झाले. पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते.

यामध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला असल्याची माहिती मिळाली मात्र या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र तेलतुंबडे याच्या मृत्यूमुळे नक्षली चळवळ खिळखिळी झाली असून पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.


मिलिंद तेलतुंबडे कोण आहे ?

मिलिंद तेलतुबंडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा छोटा भाऊ आहे. तो मुळचा वणी येथील असून मागील कित्येत वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय आहे. तेलतुंबडे याने भाकप माओवादी या पक्षाचा महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम केलेले आहे. तो सह्याद्री, ज्योतिराव, श्रीनिवास अशा वेगवेगळ्या नावानी ओळखला जातो. मिलिंद तेलतुंबडेच्या डोक्यावर ५० लाख रुपये बक्षीस घोषित करण्यात आले होते यावरून त्याचे महत्व लक्षात येते. त्याची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता,उर्फ कविता ही बी.एस्‌सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्‌एस्‌सी.(झुऑलॉजी), एम्‌ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या