पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट कारणार : कदम

 किरीट सोमैय्यांना माहिती पुरवल्याचा आरोप 




मुंबई

परिवहन मंत्री अनिल परब तसेच मिलिंद नार्वेकर यांच्या अनधिकृत बांधकामाबाबतची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा  आरोप असलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी  'मी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करणार असून त्यात अनेक गौप्यस्फोटही करण्याचा इशारा दिला आहे. माझ्याविरोधातील बातम्या कुठून येतात, कोणाचा हा कट आहे, हे मला माहीत नाही पण मी कडवा शिवसैनिक आहे. भगव्या झेंड्याचा शिपाई आहे आणि मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही, असे कदम म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत असलेले रामदास कदम बुधवारी माध्यमांसमोर आले. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कदम यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.

रामदास कदम यांच्या संभाषणाच्या कथित क्लिप व्हायरल झाल्या होत्या. रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे या व्यक्तीच्या माध्यमातून परिवहन मंत्री अनिल परब तसेच मिलिंद नार्वेकर यांच्या अनधिकृत बांधकामाबाबतची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा त्याआधारे करण्यात आला होता. मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी या क्लिप सादर करताना अनेक दावे केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले आहे.

रामदास कदम यांनी यावेळी बाळासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मराठी माणूस आज ताठ मानेने जगतोय ते केवळ आणि केवळ बाळासाहेबांमुळेच, असे सांगताना आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना बाळासाहेबांनीच मोठे केले, असे कदम म्हणाले. दरम्यान, रामदास कदम यांच्या कथित क्लिप व्हायरल झाल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पक्षविरोधी कारवाया केल्याने कदम यांच्यावर पक्षनेतृत्वाकडून कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या