परमबीर सिंग फरार घोषित


मुंबई

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल असलेले व गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरार घोषित केले. परमबीर सिंग यांच्याबरोबरच रियाज भाटी आणि विनय सिंह यांनाही फरार घोषित करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाचे न्यायाधीश भाजीपाले यांनी हा निर्णय दिला. पोलीस आयुक्तपद भूषवलेल्या एका अधिकाऱ्याला न्यायालयाने फरार घोषित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

अँटिलिया स्फोटकांच्या प्रकरणात काही पोलिसांचाच सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून राज्य सरकारने परमबीर सिंग यांची मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली केली. त्यानंतर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटींच्या खंडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसे पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्यामुळं उठलेल्या राजकीय गदारोळामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला व अखेर ईडीने त्यांना अटक केली. मात्र, परमबीर सिंग यांच्यावरही खंडणीचे आरोप झाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या