मुंबई : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. हा कसोटी सामना भारताच्या अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे. देशातील अनेक मोठे खेळाडू या मालिकेसाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक नवीन खेळाडूंना या सामन्यात संधी मिळाली आहे, ज्यांना स्वत:ला सिद्ध करायचे आहे. तरुणांसोबतच संघातील अनुभवी खेळाडू आणि सध्याचा उपकर्णधार चेतेश्वर पुजारासाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे. खराब फॉर्ममुळे पुजारा बऱ्याच दिवसांपासून टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. कानपूर कसोटीतही तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता त्याच्यावर अधिक टीका होऊ लागली आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत तो संघाची जबाबदारी घेईल अशी अपेक्षा होती, पण पुजारा दोन्ही डावात अपयशी ठरला. त्यामुळे आता संघातील त्याचं स्थान धोक्यात आलं आहे.
पुजाराने पहिल्या डावात 26 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात तो 22 धावा करुन बाद झाला. दोन्ही डावात मिळून तो केवळ 48 धावांचं योगदान देऊ शकला. त्याहूनही अधिक म्हणजे, संघाला त्याची सर्वाधिक गरज असताना पुजाराने त्याची विकेट गमावली. 2021 मध्ये पुजाराची आकडेवारी चांगली राहिलेली नाही. ही आकडेवारी पाहता त्याचा धावांचा दुष्काळ स्पष्टपणे दिसून येतो. 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांच्या 21 डावांमध्ये त्याने 30.42 च्या सरासरीने एकूण 639 धावा केल्या आहेत. त्याने 50, 77, 25, 56, 73, 15, 21, 7, 0, 17, 8, 15, 4, 12, 9, 45, 1, 91, 4, 61, 26, 22 धावांच्या खेळी खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने दोन अर्धशतके झळकावली पण तेव्हापासून त्याची बॅट शांत आहे. त्याच्या बॅटमधून बरेच दिवस शतक झाले नाही. पुजाराने 2019 मध्ये शेवटचे शतक झळकावले होते. 2019 मध्ये अॅडलेडमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे शतक झळकावले होते. त्या सामन्यात पुजाराने 193 धावा केल्या होत्या.
0 टिप्पण्या