नगर
शिवसेना पदाधिकारी पदाधिकारी गुन्ह्यांत अडकल्याने पक्षावरील टीका टाळण्यासाठी तातडीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एकाच दिवशी पक्षाने दोन पदाधिकाऱ्यांना दणका दिला. गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली तर बायोडिझेल प्रकरणात सूत्रधार म्हणून नाव आल्याने अहमदनगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. या पदांवर लवकरच नव्या व्यक्तींची निवड करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यापासून नगरमध्ये बायोडिझेलच्या अवैध विक्रीचे प्रकार उघडकीस येत आहेत. अहमदनगर शहरालगत पोलीस आणि पुरवठा विभागाने अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. यात बायोडिझेल विक्री करणारे, विकत घेणारे ट्रकचालक यांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख आणि केडगावमधील हॉटेल व्यावसायिक दिलीप सातपुते यांचे नाव यामध्ये पुढे आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून सातपुते हेच यात सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. शहरप्रमुखांचा संबंध अवैध बायोडिझेल विक्री प्रकरणाशी असल्याचे पुढे आल्याने आता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असल्याने शिवसेनेवर टीकाही सुरू झाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून तत्काळ दखल घेण्यात येऊन कारवाई करण्यात आली.
सातपुते अद्याप गायब असून अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. तपासात आणखी काही आरोपींची नावेही पोलिसांना मिळाली असल्याचे सांगण्यात आले. पक्षाने कारवाई केल्याने पोलिसांच्या कारवाईला आणखी वेग येणार असल्याचे सांगण्यात येते. अशी कारवाई बीडमध्येही करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात पोलिसांनी गुटख्याच्या गोदामावर छापे टाकले होत. हा व्यवसाय शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेथेही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे पक्षाने खांडे यांनाही पदावरून हटविले आहे.
0 टिप्पण्या