Breaking News

धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करू : दाते


टाकळी ढोकेश्वर प्रतिनिधी

धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करू सभापती काशिनाथ दाते शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी ढोकी तालुका पारनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्कार केंद्राचे उद्घाटन व धनगर समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्कार केंद्राचे उद्घाटन श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. इंजि.डी‌.आर.शेंडगे, दादाभाऊ चितळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पंचक्रोशीतील धोत्रे, तिखोल, ढवळपुरी, गाजीपुर, कासारे पळशी, वनकुटे येथील सुभाष सासवडे, सरपंच मंचरे, थोरात गुरुजी, गावडे सरदार, भांड, दातीर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी संस्कारमय प्रतिष्ठान चे अध्यक्ष पोपटराव महानोर, उपाध्यक्ष बाबासाहेब नऱ्हे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रमुख पाहुण्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व आजची युवा पिढी साठी संस्कारांची आवश्यकता केंद्राच्या माध्यमातून कशी होऊ शकते हे विशद केले.

इंजि.डी.आर.शेंडगे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी दाते यांच्या व विधानसभा माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर समाजाची बैठक करुन सरकारने आरक्षणासाठी केंद्राकडे शिफारस पाठवावी अशी मागणी केली. त्यावर दाते यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक नियोजन करण्याची ग्वाही दिली. यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले, मला कुठलाही राजकीय वारसा नसताना मी राजकारणात समाजाचे जनहिताचे काम करून इथपर्यंत पोहोचलो आहे. तसेच ढोकी येथील भुसारे वस्ती रस्ता मुरमीकरण, पठाण वस्ती येथील रस्ता तसेच सभामंडप करून देण्याचे आश्वासन सभापती दाते यांनी दिले. यावेळी सखाराम मंचरे यांना ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले. मेळाव्यासाठी जबाजी नऱ्हे, किरण धरम, कैलास नऱ्हे, व युवकांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments