जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु

शासकीय कर्मचारी व अधिकारी संघटनांचा पाठिंबा


नगर

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयाला अद्ययावत आग प्रतिबंधक यंत्रणा बसवून देण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय व कर्मचारी संघटनेने बुधवारी काम बंद आंदोलन केले. या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध शासकीय कर्मचारी व अधिकारी संघटनांनी पाठिंबा दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरु असताना आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या काम बंदमुळे रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. 

जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्‍य यंत्रणेतील कर्मचारी व अधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात तातडीची रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले असले तरी तेदेखील आंदोलनामध्ये सहभागी असतील, अशी भूमिका महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी मांडली.

'सर्व सरकारी रुग्णालयाच्या ठिकाणी फायर ऑटोमेशन सिस्टीम व स्मोक डिटेक्टर सिस्टीम तसेच आग विझवण्याची यंत्रणा अहोरात्र उपलब्ध असलेली तातडीने बसवून मिळावी, सर्व सरकारी रुग्णालयांचे दर सहा महिन्यांनी फायर सेफ्टी ऑडिट करण्यात यावे. प्रत्येक सरकारी रुग्णालयाच्या ठिकाणी अग्निशमन अधिकारी अहोरात्र उपलब्ध करून देण्यात यावा, कोणत्याही शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी परिसेविका, अधिपरिचारिका व कक्षसेवक अथवा सफाई कर्मचारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या वैद्यकीय व्यक्तीला (रुग्णसेवेशी संबंधीत) हे वरील १ ते २ मुद्द्याबाबतीत पात्रता नसलेले व पूर्णतः अप्रशिक्षीत असल्यामुळे सदरील रुग्णालयीन आग व वीज संबधित दुर्घटनांना त्यांना व्यक्तीशः जबाबदार धरण्यात येऊ नये, अहमदनगर आणि भंडारा आग दुर्घटनाची पुर्नरावृत्ती होऊ नये व गरीब निष्पाप रुग्णांचे बळी जाणार नाही त्यासाठीच्या सर्व उपाययोजना तज्ञ समिती स्थापन करून त्यानुसार सुरक्षा उपाययोजना कराव्यात,' अशी मागणी आंदोलनकर्त्या संघटनांनी केली आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन

'कायदेशीर प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. जी प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, त्यावर आम्ही कोणतीही भूमिका मांडणार नाही. जोपर्यंत सदर मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू होईल,' असा इशाराही या संघटनांकडून देण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या