नीरा भीमा कारखान्याचे एका दिवसात उच्चांकी गाळप


इंदापूर  प्रतिनिधी 

शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये शनिवारी (दि.६) एका दिवसामध्ये उच्चांकी ५००५ मे.टन ऊसाचे गाळप केले, अशी माहीती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.७ ) दिली.

नीरा भीमा कारखान्याचा २१ वा गळीत हंगाम सध्या उत्कृष्ठपणे चालु आहे. आज अखेर कारखान्याने ७० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केले असून, कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत.  चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या ऊस प्रति टनास २५०० रुपयांपेक्षा अधिकचा भाव देण्याचा निर्णय कारखान्याने जाहीर केला आहे, अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

चालू गळीत हंगामात ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. सदरचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ऊस पिकासाठी कारखान्याचे ' कृषीरत्न ' हे सेंद्रिय खत उधारीवर विक्रीसाठी उपलब्ध असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी ३५०० मे.टन असताना एका दिवसात उच्चांकी ५००५ मे.टन गाळप पूर्ण केलेबद्दल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, ऊस वाहतूकदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो. घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या