ऊसतोडणी मजुरीचे दर आवाक्याबाहेर

ट्रॅक्टर वाहतूकदारांची वाढली डोकेदुखी


कासार पिंपळगाव

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला असून गेल्या अनेक वर्षांपासून मजूर तुटवडा भासत आहे. त्याचा फायदा उठवत काही ऊसतोड मजूर मात्र, तोडणी वाहतूकदारांची कोंडी करताना दिसत आहेत.

एका कोयत्यासाठी दीड लाखापर्यंत मजुरी घेतली जात आहे. तोडणी वाहतूकदारांकडून मजूर अवाजवी कोयता उचल घेत आहेत. त्यामुळे वाहतूकदारांची मोठी अडचण झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसणार आहे.

हंगाम सुरू झाल्याने कारखान्याशी संबंधित सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. हंगामात ऊसतोडणी कामगार व ऊसपुरवठा करणारी यंत्रणा महत्त्वाचे दुवे मानले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून तोडणी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. गत वर्षभरापासून या समस्येने रौद्ररूप धारण केले आहे. शेतीत ऊस हे मुख्य पीक शेतकरी घेतात. उसाबरोबर हंगामी पिकातून उत्पन्न घेताना शेतीपूरक व्यवसाय सांभाळत आहेत. बैलगाडी व ट्रॅक्टरद्वारे ऊसतोडणी वाहतूक करण्याचा व्यवसाय काही शेतकरी करतात. ट्रॅक्टर वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांना तोडणी मजुरांचा आधार घ्यावा लागतो. परीसरातून तसेच तालुक्यातून बीड,औरंगाबाद जिल्ह्यातून आदी भागांतून तोडणी मजूर येतात. याकामी त्यांना कोयता उचल द्यावी लागते. या प्रक्रियेत साखर कारखानदारांनी अलीकडे सावध पवित्रा घेत वाहतूकदारांना याकामी उचल देत मजुरांशी थेट होणारा व्यवहार कमी केला आहे. ट्रॅक्टर मालकांना मुकादम प्रतिटोळी चार ते पाच लाख रुपये देत आहेत. मात्र, तोडणी मजूर ट्रॅक्टर मालकांची अडवणूक करत अवाजवी उचल मागत आहेत.

 प्रतिटोळीस सात लाखांपासून बारा लाख रुपयांपर्यंत उचल द्याव्या लागत आहेत. मजूर तुटवड्यामुळे वाहतूकदारांना जोखीम घेऊन हा व्यवहार करावा लागत आहे. कोयता उचलीचे दर गगनाला भिडले असल्याने वाहतूकदारांची डोकेदुखी वाढली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसणार असल्याचे   टॕक्टर ऊस वाहतूक करणारे चालक मालक संघटनेचे नेते सोमनाथ थिटे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या