बाजारसमिती निवडणुकीत विरोधकांचे पानीपत करणार : आ.निलेश लंके


पारनेर तालुका प्रतिनिधी 

जिल्हा बँकेप्रमाणे  बाजार समितीचे निवडणूकीतही विरोधकांचे पाणीपत करणार असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पारनेरच्या स्नेह मेळाव्यामधे केले. जिल्हा बँक असो वा बाजार समिती सहकार चळवळीमधे जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदयराव शेळके व संचालक व बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांचे काम आदर्शवत आहे. तसेच सहकारामधे दोघांचेही काम चांगले असल्याचे सांगत आमदारांनी दोघांच्याही पाठीवर कौतुकाची थाप टाकली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने पारनेरमधे सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सचिवांचा स्नेहमेळावा  पारनेर मधील गणेश मंगल कार्यालयात बुधवारी आयोजित केला होता. 

यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदयराव शेळके,जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर,जिल्हा बँक संचालक व पारनेर बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, वैधानिक महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,बाजार समितीचे संचालक शिवाजी बेलकर, सावकार बुचुडे,लहु थोरात,अण्णा बढे,प्रदिप सोमवंशी,बाबाजी भंडारी,बी. एन. भालेकर,विक्रम कळमकर, किसनराव रासकर,जिल्हा बँकेचे टिडिओ इंद्रभान शेळके,सहाय्यक निबंधक गणेश औटी, सोमनाथ वरखडे,सचिव नेते दत्ता पतके, बापुसाहेब चंदन, रा.या.औटी, बबलु रोहकले,प्रदिप सोमवंशी, खंडु भाईक, राजेंद्र शिंदे,राहुल झावरे, सखाराम औटी, भागुजी झावरे, जालिंदर वाबळे,भागाजी गावडे ,अशोक ढवळे,कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर लाळगे, अमोल रेपाळे, राजु पठारे,गोकुळ लोंढे, आदींसह मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी पारनेर तालुक्यातील सेवा संस्थेच्या सभासदांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष  उदयराव शेळके यांना संस्थेमधील विविध अडी अडचणींवर प्रश्न उत्तराच्या स्वरुपात चर्चा केली.

याप्रसंगी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले, पारनेर तालुक्यात प्रथमच जिल्हा  बँकेच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन केले असुन, जिल्हा बँकेने कामाच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण केला आहे. बँकेचे अध्यक्ष  उदयराव शेळके बँकेची गाडी वापरत नाही. सॉलिसिटर स्वर्गीय गुलाबराव शेळके यांच्या विचारांचा वसा व वारसा चालवण्याचे काम त्यांनी केले आहे. बाजार समितीच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे संचालक व सभापती प्रशांत गायकवाड सर्व सामान्य शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. याचवेळी विरोधकांकडुन सहकाराचा वापर हा चुकीचा करत आहेत. जिल्हा बँक आणि बाजार समितीच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना मदतीसाठीच हा स्नेह मेळावा आयोजित केला आहे. आगामी बाजार समिती निवडणुकीमधे आपण विरोधकांचे पानीपत केल्याशिवाय राहणार नाही असे आमदार लंके म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपदी उदय शेळके यांना संधी देऊन पारनेरकरांना झुकते माप दिले असल्याचे प्रतिपादन आमदार लंके यांनी केले.

याप्रसंगी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष  उदयराव शेळके म्हणाले, आपल्या निवडणुकीसाठी आमदार निलेश लंके यांनी विशेष मेहनत घेतली तसेच संचालक पदाबरोबर अध्यक्ष पदाचीही संधी दिली. राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यावर तालुक्यातील शेतकरी सभासदांना १०० कोटींची कर्जे माफी दिली.

यावेळी बोलताना सभापती प्रशांत गायकवाड म्हणाले,  सहकार क्षेत्रात काय नवनवीन उपाययोजनांसाठी  दर महिन्याला विशेष बैठक आयोजित केली जात आहे. बाजार समिती व जिल्हा  बँकेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाची सेवा करण्याची संधी पक्षाने दिली. जिल्हा बँक व बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी  व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे सभापती प्रशांत गायकवाड म्हणाले.

विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांवरील  कर्ज सभासदांसाठी बिनव्याजी मिळेल. गटसचिवांच्या मोठ्या प्रमाणावर समस्या असुन गावातील होतकरु जीडीसी व संगणकीय ज्ञान असलेल्या तरुणांना प्राधान्य द्यावे असे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सांगितले आहे. २ लाखापर्यंतची कर्जमाफी यादी बनविण्याचे काम सुरु असुन, लवकरच अंतीम यादी तयार केली जाईल असे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या