.. तर आज मी फोटोग्राफी केली असती : मुख्यमंत्री ठाकरे


मुंबई

मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जातो. तर असा कुठलाही शब्द दिला नसल्याचा दावा भाजप नेते करत असतात. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज निशाणा केले. ‘ठरल्याप्रमाणे जर सगळे झाले असते तर आज मी फोटोग्राफी केली असती अन तुम्हाला प्रदर्शनाला बोलावले असते’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी वर्षा निवासस्थानी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.’ठरल्याप्रमाणे जर सगळे झाले असते तर आज मी फोटोग्राफी केली असती अन तुम्हाला प्रदर्शनाला बोलावले असते’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला. मंत्रालयात वॉर रुम होती. मी विचार केला की वॉर कुणाशी करायचे ? म्हणून मी त्यांचे नाव बदलून संकल्प कक्ष केले. नव्या योजना आखण्यासाठी याचा वापर करायचा होता. पण कोरोनामुळे तिथले अधिकारी दुसरीकडे द्यावे लागले. आता त्याला चालना देत आहोत. असे सांगतानाच आपण लवकरच मंत्रालयात येऊन कारभार पाहू असेही त्यांनी सांगितले.राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिआरोप याविषयी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, हल्ली कोण काय आरोप करील आणि प्रकरण कुठे घेऊन जाईल, हे सांगता येत नाही. आजकाल राजकीय आरोपांमध्ये कोरोनाप्रमाणे उत्परिवर्तन होत आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दिवाळीनंतर फटाके फुटतील, या भाजप नेत्यांच्या दाव्यावर मुख्यमंत्री म्हणाले, राजकीय फटाके फोडायला दिवाळीची गरज नसते. तुम्ही इथल्या फटक्यांची काय भाषा करता, पाकिस्तानात फटाके कधी फोडताय हे पण जरा सांगा, अशी विचारणा त्यांनी भाजपला केली.सामाजिक उत्तरदायीत्व निधीच्या वापराविषयी प्रश्न केला असता, ते म्हणाले, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे काम सुरु आहे. आपण ते बंद केलेले नाही. सीएसआर फंड आपल्याकडे किती येतो आणि किती खर्च करतो याचे म्हणाल तर पंतप्रधान आणि मी एकत्रीत त्याचा हिशोब देणार आहोत, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी लगावली. कोरोनाची तिसरी लाट राज्यात येईल किंवा येणार पण नाही. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधकच्या दुसऱ्या मात्रेकडे दुर्लक्ष करणे घातक ठरु शकते. सध्या दैनंदिन १५० मेट्रीक टन प्राणवायु लागतो आहे. तो ७०० टनावर गेला की पुन्हा टाळेबंदी लावावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या