भाजपशाशीत नऊ राज्यांनी केली पेट्रोल-डिझेल करकपात

केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद; महाराष्ट्र सरकारकडे लक्ष


मुंबई

केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे 5 रुपये तर डिझेलमागे 10 रुपये कमी केले आहेत. राज्य सरकारनेही व्हॅट करात कपात करावी असे आवाहन केंद्राकडून करण्यात आल्यानंतर भाजप शासित नऊ राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता महाराष्ट्र राज्य सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, बिहार या भाजप शासित राज्यांनी त्यांच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना आता तुलनेने स्वस्त दरात पेट्रोल मिळणार आहे.

महत्वाचे म्हणजे या व्हॅट कपात करण्याचा निर्णय घेतलेल्या नऊ राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, गुजरात आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या भाजप शासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे. इंधन दर कपातीचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा विरोधक आरोप करत आहेत.

केंद्र सरकारने आणि नऊ राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरच्या करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातही तशा प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होताना दिसत आहे.

दरम्यान, इंधन दरकपातीवरुन खा. संजय राऊतांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. पोटनिवडणुकीतल्या भाजपच्या पराभवानंतर पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी झाल्याचं राऊत म्हणालेत. तर पेट्रोलचे दर 50 रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा लागेल, असे ते म्हणाले.

पण निवडणुकांच्या निमित्ताने का होईना सणासुदीच्या दिवसात महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळाला. आता राज्य सरकारकडून जनतेला काय दिलासा मिळतो, ते पाहणे महत्वाचे!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या