मी आठ दिवसात परत नगरला येणार, फायली काढून ठेवा

क्रीडामंत्री सुनील केदार यांचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना निर्देश
शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळीच्या पुढाकारातून आयोजित क्रीडा संघटनांच्या बैठकीत क्रीडा मंत्र्यांचे आदेश 


नगर 

नगर मधील क्रीडा संघटना आणि क्रीडापटूंचे प्रश्न मी मार्गी लावून देतो. तुम्हाला मुंबईला, पुण्याला बैठकीसाठी बोलणार नाही. येत्या आठ दिवसात मी पुन्हा नगरला येणार. जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी तुम्ही फाईल काढून ठेवा. आपल्याला शहरातील क्रीडा क्षेत्राचे प्रश्न सोडवायचे आहेत. असे फर्मानच राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी क्रीडा संघटना, क्रीडापटूंच्या बैठकीत काढले. 

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री सुनील केदार हेलिकॉप्टरने नगर शहरात दुपारी दाखल झाले. काळे यांच्या पुढाकारातून नगर शहरातील विविध क्रीडा संघटना, क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांच्या विविध प्रश्नांवर बैठकीचे आयोजन सावेडीच्या कोहिनूर मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ना. केदार बोलत होते. 

बैठकीचे प्रास्ताविक करताना क्रीडा क्षेत्राचे प्रश्न मांडताना किरण काळे म्हणाले की, वाडिया पार्क सारखे विस्तीर्ण मैदान शहरामध्ये ना.थोरात यांच्या पुढाकारातून उभे राहिलं. मात्र काळाच्या ओघात त्यावर सोयी-सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. या मैदानावर आम्हाला सिंथेटिक ट्रॅक करून पाहिजे. कबड्डी, लॉन टेनिससाठी सिंथेटिक मैदान पाहिजेत.  

नगर-पुणे महामार्गा लगत सुमारे सात एकराचा भूखंड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या नावाने असून तो मागील तीस-चाळीस वर्षांपासून पडिक आहे. या मैदानाचा क्रीडांगण म्हणून विकास झाला पाहिजे. पुण्याच्या बालेवाडीच्या धर्तीवर नगर शहरामध्ये देखील मिनी बालेवाडी उभे करण्याचे आमचे स्वप्न आहे. याठिकाणी सायकलिंग ट्रॅक, तसेच सर्व खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही तुमच्या मागे लागणार आहोत. तुम्हाला आम्हाला मदत करावी लागेल, असा आग्रह यावेळी काळे यांनी क्रीडा मंत्र्यांकडे धरला. 

जिल्हा क्रीडा संकुल आवारात १८ ते २० गाळे पडीक आहेत. शहरातील क्रीडा संघटनांना हे गाळे त्यांच्या कार्यालयांसाठी उपलब्ध करून दिले जावेत. स्पर्धा आयोजनासाठी मुलींचे वस्तीगृह नसल्यामुळे आयोजक संघटनांना मोठा खर्च स्पर्धकांच्या राहण्याचा करावा लागतो. यासाठी मुलींचे वस्तीगृह आम्हाला करून द्या.मुलांचे वसतिगृह अद्यावत करून द्या. खेलो इंडियाचे नगरला एकच सेंटर मिळाले. एवढ्यावर आमचे भागत नाही. बाकी खेळांचा देखील प्रश्न मिटला पाहिजे. त्यांचे सुद्धा सेंटर्स केंद्र सरकार कडून नगरला मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणी यावेळी क्रीडापटूंच्या वतीने काळे यांनी केली. 

काळे म्हणाले की, शिवछत्रपती पुरस्कार सोहळा आयोजनाचे यजमान पद आम्हाला द्या. आम्ही त्याची जोरदार तयारी करून या माध्यमातून नगरचे नाव सर्वदूर पोहोचवू. वादग्रस्त भूतपूर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामुळे नगरचे क्रीडा क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. भविष्यात याची पुनरावृत्ती नको. यासाठी सकारात्मक मनोवृत्तीचा, कार्यक्षम जिल्हा क्रीडाधिकारी नगरला देण्याची मागणी यावेळी काळे यांनी क्रीडा मंत्र्यांकडे केली. 

मागण्यांना उत्तर देताना ना. केदार म्हणाले की, येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये मुलींच्या वसतिगृहासाठी निधी मंजूर करण्याचे काम केले जाईल. किरण काळे यांच्या माध्यमातून नगर शहरातील क्रीडा क्षेत्राशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. तुम्ही मुंबईला यायची गरज नाही. मीच आठ दिवसात पुन्हा नगरला येऊन येथे बैठक घेवून नगर शहराचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम करणार आहे. ना.केदार यांच्या या घोषणेचे क्रीडा संघटनांनी जोरदार टाळ्या वाजवत स्वागत केले. 

आजच्या धावत्या दौर्‍यामध्ये संघटनांच्या प्रतिनिधींचे मनोगत इच्छा असूनही मला ऐकता आले नाही. मात्र पुढील दौऱ्यामध्ये मी सगळ्यांचं सविस्तर ऐकणार आहे. क्रीडा संघटनांना न्याय देण्याचे काम त्या माध्यमातून केले जाईल, असा विश्वास यावेळी ना. केदार यांनी क्रीडा संघटनांना दिला. 

किरणला शहराचे सर्वेसर्वा करायचे - ना. केदार 

यावेळी ना.सुनील केदार यांनी ना.थोरात यांच्या उपस्थितीत यावेळी किरण काळे यांचे कौतुक करत असताना केलेल्या टिप्पणीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. केदार म्हणाले की, आम्हाला किरणला शहराचा सर्वेसर्वा करायचा आहे. त्याच्या अंगाला गुलाल लावण्याची संधी आम्हाला नक्की मिळेल, असे म्हणत आगामी आमदारकीसाठी काळे यांना काँग्रेसच्या वतीने शहरात पूर्ण ताकद दिली जाणार असून शहरात काळे यांना काँग्रेसचा आमदार करण्यासाठी पक्ष भक्कमपणे काळे यांच्या पाठीशी उभे असल्याची घोषणाच यावेळी ना. केदार यांनी केली. केदार पुढे म्हणाले की, ना. थोरात यांच्या नेतृत्वात २०१९ च्या निवडणुकी मध्ये पक्ष राज्यात सत्तेत आला. त्याच पद्धतीने नगर शहराचे देखील किरण काळे सर्वेसर्वा होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. 

यावेळी आ.संग्राम थोपटे, आ. लहू कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, शहर क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, रंगनाथ डागवले, राजेंद्र कोतकर, संजय साठे, सुनील जाधव, आप्पासाहेब शिंदे, दिनेश भालेराव, विलास दवणे, विजय म्हस्के, नीलेश शेलार, जयसिंग काळे, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरंगे, घनश्याम सानप, संभाजी लोंढे, शैलेश गवळी, मच्छिंद्र साळुंके, नारायण कराळे, प्रसाद पाटोळे, आदिल सय्यद आदींसह क्रीडा संघटना, क्रीडा प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या