अवघ्या पंधरा- वीस रुपये किलोने विकली झेंडूची फुले


जामखेड तालुका प्रतिनिधी

शेतकऱ्याने मोठ्या आशेने लागवड केलेल्या झेंडूच्या फुलांना दसऱ्याला भाव मिळाला नाही. यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा दिवाळी सणाकडे लागल्या होत्या. मात्र दिवाळी गोड होईल , ही आशा फोल ठरली असून दसऱ्याप्रमाणे दिवाळीही शेतकऱ्यांची कडूच झाली आहे.

अवघ्या मातीमोल किमतीत पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलोने  फुले विकल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ९० ते ११० रुपये प्रती किलो असा भाव झेंडू फुलांना मिळत असल्याने यंदा जवळा , नान्नज परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली होती. 

दसरा व दिवाळी या दोन सणांमध्ये झेंडूची फुलांना प्रचंड मागणी असते. दसरा सणाला शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने बाजारात नेलेल्या झेंडूला वीस रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे झेंडू लागवडीचा खर्चही निघाला नाही. यानंतर असलेल्या दिवाळीला कसर भरून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र दिवाळीनेही निराशा केली असून व्यापाऱ्यांनी केवळ पंधरा ते वीस रुपये किलो दराने झेंडू  फुले खरेदी केली. असा मातीमोल भाव मिळाल्याने शेतकरी चांगलेच नाराज झाले.

काही जणांवर फुले फेकून देण्याची वेळ आली

जवळा , नान्नज परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. मात्र , झेंडूला मनवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी झेंडूची फुले रस्त्यावर फेकून दिली. 


दसऱ्याला कमी भाव मिळाल्याने फुले फेकून दिली. दिवाळीनेही निराशा केली असून तोडणीचा खर्चही निघाला नाही. 

- उद्धव रोडे : फुले उत्पादक शेतकरी , जवळा. 


मोठया अशेने झेंडूच्या फुलांची एका एकरात लागवड केली होती. दसरा व दिवाळी सणाला अवघ्या पंधरा ते वीस रुपये भाव मिळाल्याने झेंडू लागवडीचा व झेंडू तोडणीच्या मजुरीचा खर्चही निघाला नाही. 

 - अमृत जाधव : फुल उत्पादक शेतकरी , जवळा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या