भर पावसात कडाडली विखे आणि राम शिंदे यांची तोफ


कर्जत  
आरोप-प्रत्यारोप, एकमेकांवर चिखलफेक मनोरंजनाची साधने झाली आहे. सध्या न्युज चॅनेलवर राज्य सरकारमधील एक व्यक्ती खुर्चीवर बसून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणी किती गांजा मारला, कोण किती किमतीचा शर्ट घालतो, कोणी कधी किती सुट्या मारल्या, कोणाचे पायातील बुट किती रुपयांचे आहे, यासह कोणी आत कोणती चड्डी घालतय हे सांगण्याचे काम छान करतोय. यांना सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नाचे काही देणे घेणे नाही. अतिवृष्टीची एक रुपया देखील नुकसानभरपाई न मिळाल्याने राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यंदा काळी दिवाळी ठरली आहे. मात्र सुस्त सरकार फक्त प्रवक्तेच काम करतेय असा घणाघाती आरोप खा सुजय विखे यांनी राज्य सरकारवर केले. ते कर्जत येथे माजीमंत्री राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. भरपावसात खा विखे आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आपले भाषण पूर्ण केले. 
यावेळी पुढे बोलताना खा विखे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात पावसाची सभा निर्णायक ठरली होती. तशी आजची ही पावसाची सभा कर्जत नगरपंचायतीसाठी निर्णायक ठरेल असा आपला विश्वास आहे. आज या पावसात आपला नंबर लागला ते आपले भाग्य समजतो असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णायक सभेची आठवण उपस्थिताना करून दिली. सध्या कर्जत- जामखेड मतदारसंघात व्यक्ती स्वातंत्र्यावर दबावतंत्र वापरून पक्षांतर करण्याचे काम चालू आहे. लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव टाकून स्वार्थ साधला जात आहे असा टोला नाव न घेता आ रोहित पवार यांना लगावला. यासाठी आगामी काळात व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहायचे असेल राम शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत आज फार बोलायचे होते मात्र वाढत्या पावसामुळे आपले भाषण आटोपते घेतले. 
यावेळी बोलताना माजीमंत्री राम शिंदे म्हणाले की, आपण शब्द पाळणारा माणूस आहे. मंत्रीपदाच्या काळात दिलेले शब्द विकासकामाच्या रूपाने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला. विकासकामे करताना कधी दबावाचे अथवा खुनसीचे राजकारण केले नाही. आले त्यांचे काम करण्याचा इमानदारीने पुरेपूर प्रयत्नच केला. 
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, दादासाहेब सोनमाळी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे, अनिल गदादे, काळासाहेब धांडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ नेते शांतीलाल कोपनर, अल्लाउद्दीन काझी, एकनाथ धोंडे, दत्ताआबा गोसावी भगवान मुरूमकर, किसान मोर्च्याचे सुनील यादव, विनोद दळवी, शहराध्यक्ष वैभव शहा, ज्ञानदेव लष्कर, गणेश पालवे, सुमित दळवी, पप्पू धोदाड, बापू शेळके, प्रवीण फलके, नगरसेवक तारक सय्यद, सोयब काझी, शेखर खरमरे, आफताब सय्यद, नंदलाल काळदाते, नगरसेविका राणी गदादे, नीता कचरे, राखी शहा, मंदा होले, मनीषा वडे, आशा वाघ, आश्विनी दळवी-गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

चौकट : खासदारांनी चान्स मारला, तर मी कसा सोडू - राम शिंदे
सभेस सुरुवात झाली त्यावेळी रिमझिम पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे अनेक भाषणे रद्द करीत अध्यक्षीय भाषण म्हणून खा सुजय विखे यांना जिल्हाध्यक्ष मुंढे यांच्यानंतर संधी दिली गेली. खा विखे यांच्या भाषण सुरू असताना अचानक मोठ्या पावसास सुरुवात झाली. त्यामुळे विखेंना देखील काही महत्वाच्या मुद्यांना बगल देत भाषण आटोपते घ्यावे लागले. मात्र त्यांनतर स्वत: राम शिंदे यांनी पुढे येत माईक ताब्यात घेत धडाकेबाज भाषण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पराभवानंतर प्रथमच राम शिंदे यांनी जाहीर सभा घेतली असल्याने भर पावसात लोकांनी दोन्ही नेत्यांचे भाषण ऐकले हे विशेष. 

 एका सर्व्हेत मतदारसंघातील जवळपास २८ हजार मुले विना लग्नाची आहे असे पुढे येत आहे. मग आपल्या पराभवानंतर विद्यमान आमदारांनी किती मुलांची लग्ने लावली आहेत याचा खुलासा करावा असे म्हणत आ रोहित पवार यांना लक्ष्य केले. यासह यांचे आजोबा, काकांनी निवडणूकीपूर्वी मतदारसंघात घेतलेल्या रोजगार मेळाव्यात किती तरुणांना नोकऱ्या दिल्या ते एकदा स्पष्ट करावे असा उपरोधिक टोला देखील लगावला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या