'दै. राष्ट्र सह्याद्री'चे संपादक करण नवले यांची काष्टी सेवा संस्थेस सदिच्छा भेट

 संस्थेचे कार्य व सामाजिक सहभागाविषयी कौतुक

 


लिंपणगाव( प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्ह्यात लोकप्रिय नावाजलेल्या दैनिक राष्ट्र सह्याद्री या दैनिकाचे संपादक करण नवले यांनी आशिया खंडात अग्रेसर ठरलेल्या सहकारमहर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सोसायटीस सदिच्छा भेट देऊन, अगदी बारकाईने या संस्थेच्या कार्यकर्तृत्वाची माहिती घेऊन विद्यमान संचालक मंडळाचे कौतुक केेले.

संपादक नवले हे श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी काष्टी येथील सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेस धावती भेट दिली. याप्रसंगी युवा नेते अॅड. प्रतापराव पाचपुते यांनी संपादक नवले यांचे स्वागत केले.

याप्रसंगी संस्थेच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देताना संस्थेचे सचिव गणेश पाचपुते यांनी सांगितले की ,सहकार महर्षी काष्टी सेवा संस्था ही सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक भगवानराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत असून, या संस्थेस मिळालेले पुरस्कार व सन्मान बीडीपी योजनेअंतर्गत चालवलेले विभाग, संस्थेचे भविष्यातील उपक्रम संस्थेची वैशिष्ट्ये व सांपत्तिक स्थिती सन 2020-21, सामाजिक कार्य म्हणून या संस्थेने महाराष्ट्र राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुपये अकरा लाखाची मदत केली. सांगली, कोल्हापूर, मिरज येथील पूरग्रस्तांसाठी रुपये 106430 ची मदत केली.

तसेच नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेऊन सन 2013 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या 401 छावण्यांमधील 249329 जनावरांना संस्थेचे नियोजनात मोफत पशुखाद्य वाटप करण्यात आले.

सभासद व शेतकऱ्यांचे मुलांसाठी व्यायाम शाळा व अत्याधुनिक जिम्स उभारणीसाठी आर्थिक दृष्ट्या प्रोत्साहन दिले. बचत गटांना व्यवसाय मार्गदर्शन मेळावे वेळोवेळी घेण्यात आले. देशातील, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी सुनामी नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आर्थिक मदत केली. शेती, कार्यशाळा कायदेविषयक शिबीर वृक्षारोपण कार्यक्रम पशुसेवा, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय कार्यशाळा, ठिबक सिंचन, पाणी फिल्ट्रेशन व पाणी व्यवस्थापन परिसंवाद आयोजित करण्यात आले. जनता विद्यालय  ज्युनियर कॉलेज काष्टी व कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना कला, संगीत, विविध शालेय उपक्रम राबविण्यासाठी संस्थेच्या वतीने डॉ कर्मवीर भाऊराव पाटील उभारणीसाठी आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा काष्टी येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी मिळण्यासाठी वॉटर फिल्टरची उभारणीसाठी देखील या संस्थेने हातभार लावला. यासारखे विविध उपक्रम संस्था राबवित असल्याची माहिती संस्थेचे सचिव गणेश पाचपुते यांनी यावेळी माहिती विशद करत संस्थेच्या कार्यकर्तृत्वाचा यावेळी लेखाजोखा मांडला.

याप्रसंगी दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक  करण नवले यांनी या संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना म्हणाले की, संस्थेचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक भगवानराव पाचपुते यांचे या संस्थेस खंबीर नेतृत्व लागल्यामुळेच ही संस्था देश व राज्य पातळीवर नावलौकिकास पात्र ठरली, असे सांगून ते पुढे म्हणाले की, संस्थेचे कार्य हे निश्चितच महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याचे सांगून या संस्थेच्या संचालक मंडळाचे भरभरून कौतुक केले.       

यावेळी युवा नेते अॅड. प्रतापराव पाचपुते, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर ,पत्रकार प्रा राम सोनवणे, राहुल साळवे आदी यावेळी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या