चारचाकीसाठी नवीन मालिका सुरु !


बारामती 

चारचाकी खासगी  वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक  राखून ठेवण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांनी केले आहे. 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच चारचाकी खासगी  वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक शुल्क भरुन हवा असेल त्यांनी  विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. 

हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) १२ नोव्हेंबर २०२१ रोजी (सकाळी १०:३०) ते (दुपारी २.३०) दरम्यान कार्यालयाच्या परिवहन विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील. एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी (सकाळी ११.००) वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. 

लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी हा एकाच सीलबंद पाकीटासह जमा करावा. 

दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी (दुपारी ४:००) वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लखोटा  उघडून विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी असेल त्यास नमूद पसंती क्रमांक दिला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या