एक कोटी 10 लाखांचा गांजा जप्त; दोघे अटकेत
भोपाळ
अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून गांजाची मोठी तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. विशाखापट्टनमवरून मध्य प्रदेशमध्ये कढीपत्त्याच्या नावाखाली गांजाची ही तस्करी होत होती. आतापर्यंत जवळपास एक टन गांजाची तस्करी केल्याचं समोर आले असून पोलिसांनी 20 किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी दिली.
या प्रकरणी सूरज उर्फ कल्लू आणि पिंटू उर्फ बिजेंद्रल सिंह तोमर या दोन आरोपींनी अटक केली आहे. 20 किलो गांजाची एक खेप विशाखापट्टनमवरुन अमेझॉनच्या माध्यमातून मागवली होती. भिंड जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक मनोज कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, गेल्या चार महिन्यांपासून अमेझॉनवरुन ही तस्करी सुरु होती. त्यामध्ये तब्बल एक टन गांजाची तस्करी करण्यात आली आहे. याची किंमत ही एक कोटी 10 लाख रुपये आहे.
या दोन्ही आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांच्या आणखी एका सहकाऱ्याची माहिती समोर आली आहे. त्याला पोलिसांनी हरिद्वारमधून अटक केली आहे. आरोपी सूरज हा कडी पत्त्याच्या नावाखाली ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि इतर ठिकाणी मादक पदार्थांची तस्करी करत होता. या व्यापारात अमेझॉनची भागिदारी ही 66.66 टक्के इतकी होती. आरोपी सूरजने एका कपड्याच्या कंपनीच्या नावाखाली हर्बल उत्पादने आणि कढीपत्ता उत्पादनाचा विक्रेत्याच्या नावाखाली रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर त्याला अमेझॉनवर बारकोड मिळाला होता.
देशविघातक कृत्यासाठी वापराची शक्यता
या घटनेची दखल सीएआयटी इंडियाने घेतली असून त्यांनी अमेझॉनकडून खुलासा मागवला आहे. अशा प्रकारचा अवैध व्यापार अमेझॉनच्या माध्यमातून होत असून तो घातक आहे. मनी लॉंड्रिंग आणि इतर प्रकारच्या अपराधासाठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर होत असेल तर त्याचा वापर देशविघातक कृत्यासाठी केला जाण्याची जास्त शक्यता आहे
0 टिप्पण्या