खेड (ता.) प्रतिनिधी :
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांपैकी एक 'अग्रेसर गाव' म्हणून ओळख असलेल्या दावडी गावाच्या पूर्वेस असणाऱ्या 'आरुडमल' या मनमोहक टुमदार अशा डोंगरावर सुमारे ७५० वर्षांपूर्वीचे खंडोबा मंदीर असून या मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहन व मुर्तींची पुर्नप्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवार (दि. २८) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पंचायत समिती सदस्या वैशाली गव्हाणे, मयूर मोहिते, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, विजयसिंह शिंदे, जयसिंग भोगाडे, सरपंच, संभाजी घारे, उपसरपंच, राहुल कदम, माजी सरपंच, संतोष गव्हाणे, चेअरमन, उज्वला शिंदे, साहेबराव दुन्डे आदीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
गेली अनेक वर्ष या मंदिराची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. मंदिराच्या कळसाला तडे गेले होते, खंडोबा, म्हाळसा, बाणाई या देवतांच्या मुर्त्यांसुद्धा भंगल्या होत्या. या डोंगरावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने परिसरातील भाविकभक्त केवळ ठराविक उत्सवादरम्यान या ठिकाणी मोठ्या कष्टाने नैवेद्य व तळीभंडार करण्याच्या निमित्ताने हजेरी लावत होते.
अनेक भाविकांनी पुढाकार घेऊन सढळ हाताने आर्थिक तसेच वस्तुरूपी देणगीचे आवाहन करून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. त्यांच्या या आवाहनाला अनेक स्थरातील दानशूर दात्यांनी तसेच स्थानिकानी साथ देऊन अखेर या मंदिराचा कायापालट करण्यात खारीचा वाटा उचलला.
शनिवार (दि. २७) रोजी दिंडी परिक्रमा, व दावडी गावातून मुर्त्यांची सवाद्य मिरवणूक कार्यक्रम काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी रविवार (दि. २८) रोजी 'आरुडमल' डोंगर येथे मंदिराला विदयुत रोषणाई करून मंदिराच्या गाभाऱ्यात रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत गणेश पूजनासह विविध देवतांचे पूजन करून पालघर येथील मधुसूदन स्वामी गुरुवर्य सदानंद पाटील यांचे हस्ते मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच महंत सुबोधनंद सरस्वती महाराज (आळंदी) यांचे हस्ते कलशारोहन करण्यात आला. यावेळी ह. भ. प. महंत राधाताई सानप महाराज यांचे सुमधुर कीर्तनाने कार्यक्रमाची शोभा वाढली होती. सदर कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, आजी माजी सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती विशेष करून मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. भाविकांसाठी महाप्रसाद व पिण्याचे स्वच्छ पाणी आदी व्यवस्थाही अन्नदात्यांकडून करण्यात आली होती.
0 टिप्पण्या