कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाला पुन्हा एकदा धडकी भरवली आहे. मागील दोन वर्षात कोरोनाने थैमान माजवलं होतं यावरून धडा घेत अनेक देशांनी खबरदारी म्हणून तातडीने काही नियमात बदल केले आहेत. हा नवा विषाणू सर्वात आधी दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे. त्यानंतर अनेक देशांनी दक्षिण अफ्रिका आणि इतर काही देशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.
ओमिक्रोन व्हेरिएंट हा डेल्टा एवढ्याच वेगान पसरत असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे जगभरातील अनेक सरकारं चिंतेत आहेत. दक्षिण अफ्रिकेत या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 22 पेक्षा जास्त झाली आहे. बोत्सवाना, बेल्जियम, इस्त्राईलमध्येही या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढले आहेत. त्यामुळे या देशांची चिंता वाढली आहे. युरोपमध्ये जर्मनी आणि इटलीतही या व्हेरिएंटचे नवे रुग्ण आढळून आले आहे. ब्रिटेनमध्ये पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी नवी नियमावली लागू केली आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना 10दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. ज्यांचं लसीकरण झालं आहे त्यांनाही हे नियम लागू असतील. रुग्ण आढळून आलेल्या देशातील नागरिकांना अमेरिकेने प्रवेशबंदी घातली आहे.
युरोपियन युनियननेही बाहेरील उड्डानांवर बंदी घेतली असून नियम कडक केले आहेत. कॅनडा आणि रुसनेही बाहेरील प्रवाशांवर बंदी घेतली आहे. जपानमध्ये बाहेरून येणाऱ्यांना 10 दिवस क्वारंटाईन ठेवलं जाईल आणि त्यांच्या कोरोना चाचण्याही केल्या जातील. श्रीलंका आणि बांगलादेशनेही अफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घेतली आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी नियम अधिक कडक केल्याचं दिसून येत आहे. हळूहळू पूर्वपदावर येत असलेली परिस्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे.
0 टिप्पण्या