नगर
नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी सुरूवातीपासून ज्यांच्याकडे बोट दाखविण्यात येत होते ते निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या घटनेप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि चौघांना अटक झाल्याने डॉ. पोखरणा यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे.
अटकपूर्व जामीन देताना न्यायालयाने काही निरीक्षणे यामध्ये नोंदविली आहेत. डॉ. पोखरणा यांनी रुग्णालयात आगप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यासाठी संबंधितांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे त्यांना अटक करून चौकशीसाठी पोलिस कोठडी देण्याची गरज वाटत नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी हा आदेश दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, डॉ. पोखरणा यांनी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून २३ जानेवारी २०२१ पासून अग्निसुरक्षा विषयक उपाययोजनांसाठी पाठपुरावा केल्याचे दिसून येत आहे. २८ ऑक्टोबर २०२१ च्या पत्रव्यवहारावरून या कामासाठी तांत्रिक मुंजुरी आणि निधी मिळाला नसल्याचेही आढळून येत आहे. आगीची घटना दुर्दैवी आहे. मात्र, एकूण परिस्थिती पहाता यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात डॉ. पोखरणा यांना अटक करून पोलिस कोठडी घेण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे त्यांना २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात येत आहे. डॉ. पोखरणा यांनी पोलिसांना तपासात सहकार्य करावे, ते बोलावितील तेव्हा चौकशीला हजर रहावे, यासंबंधी बाजू मांडण्यासाठी सरकारपक्षाला नोटीस काढण्यात यावी, असेही म्हटले आहे. यावर पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला होणार आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या आतिदक्षता विभागात गेल्या शनिवारी आग लागली होती. राज्य सरकारमार्फत चौकशी समिती नियुक्त करण्यात आली तर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. नंतर सरकारने डॉ. पोखरणा यांच्यासह सहा जणांना निलंबित केले. त्यानंतर पोलिसांनी एक डॉक्टर आणि तीन नर्स अशा चौघांना अटक केली. त्यांचा नियमित जामीन फेटाळण्यात आल्याने ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी कर्मचारी आणि विविध संघटनांची आंदोलने सुरू आहेत. वरिष्ठांना वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांचा बळी दिला जात असल्याचे आरोपही केले जात आहेत. घटना घडल्यापासून बहुतांश लोकप्रतिनिधी आणि संघटनांनीही डॉ. पोखरणा यांच्याकडे बोट दाखविण्यास सुरवात केली कर्मचाऱ्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याही अटकेची मागणी सुरू झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर याही पुढे जाऊन आरोग्य मंत्र्यांविरूद्धही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या गुन्ह्यात तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणीही पुढे आली आहे.
या पार्श्वभूमिवर डॉ. पोखरणा यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यावतीने अड. प्रकाश कोठारी यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आता १७ नोव्हेंबरला यासंबंधी सरकारतर्फे काय बाजू मांडली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या आतिदक्षता विभागात गेल्या शनिवारी आग लागली होती. राज्य सरकारमार्फत चौकशी समिती नियुक्त करण्यात आली तर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. नंतर सरकारने डॉ. पोखरणा यांच्यासह सहा जणांना निलंबित केले. त्यानंतर पोलिसांनी एक डॉक्टर आणि तीन नर्स अशा चौघांना अटक केली. त्यांचा नियमित जामीन फेटाळण्यात आल्याने ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
0 टिप्पण्या