आ. शिरोळेंची एसटी आंदोलनाला भेट


पुणे प्रतिनिधी

शिवाजीनगर एस.टी.आगार येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आमदार शिरोळे बुधवारी सहभागी झाले आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. कर्मचाऱ्यांनी आत्महत्त्येचा विचार मनातही आणू नये. ही लढाई धैर्याने लढायची आहे, असे आवाहन आ. शिरोळे यांनी केले. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हेकेखोरपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळला आणि अनेक कर्मचाऱ्यांनी जीव गमावले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना माझा पाठिंबा असून त्यांच्या मागण्यांबाबत ठाकरे सरकारने न्याय तोडगा लवकर काढावा अन्यथा सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज बुधवारी दिला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे महाराष्ट्रातील गांवे, शहरे जोडली गेली. गावांचा विकास झाला, घराघरातील नातेसंबंध अतूट राहिले. प्रत्येकाने कधी ना कधीतरी लालपरीतून प्रवास केलाच असेल. आता या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी सर्वांनी उभे राहाण्याची वेळ आली आहे, असे आवाहन आमदार शिरोळे यांनी केले.

यावेळी शिवाजीनगर मतदारसंघ भाजप अध्यक्ष रविंद्र साळेगांवकर, सुनील पांडे, प्रतुल जागडे, गणेश बगाडे, आनंद छाजेड तसेच शिवाजीनगर मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या