रुग्णसंख्या कमी झाली म्हणून बिनधास्त वावरणे चुकीचे


पुणे

करोना बाधितांची आणि मृत्यांची संख्या कमी होत आहे. वेगाने झालेल्या लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम आहे, असे म्हणावे लागेल. परंतु रुग्णसंख्या कमी झाली म्हणून बिनधास्त वावरणे चुकीचे ठरेल. ही संख्या वाढू नये याचे दायित्त्व प्रत्येकाचे आहे. त्यामुळे सुरक्षेच्या नियमांचे पालन करून, याचे उच्चाटन करणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. अशी माहिती डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका यांनी दिली.

गेल्या 20 महिन्यांपासून थैमान घातलेल्या करोना रोगाचे जाळे आता संपुष्टात येऊ लागले असून, मृतांची संख्याही आटोक्‍यात आली आहे. यावर्षी म्हणजे जानेवारीपासून ते आजतागायत म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्वात कमी मृतांची नोंद झाली.

ती आजपर्यंतच्या मृत्यूत सुमारे एक टक्‍काच आहे. फेब्रुवारी 2021 पासून करोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये मृतांची संख्या खूप वाढली. 30 मार्च 2020 ला पहिला मृत्यू झाला, दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले. आजपर्यंत पुणे शहरात नऊ हजार 88 करोनाबाधितांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यातील 4 हजार 467 रुग्णांचा मृत्यू गेल्या दहा महिन्यांत झाला असून, तोही फेब्रुवारी-मार्चनंतर सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

गेल्या महिन्यात म्हणजे 1 ते 31 ऑक्‍टोबरदरम्यान सात दिवस शून्य मृत्यूची नोंद शहरात झाली. तर 1 नोव्हेंबर पासून ते 17 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 17 दिवसांतच आठ दिवस शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या 19-20 महिन्यांपासून ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर हे दोनच महिने कमी मृत्यूची नोंद झाल्याचे पहायला मिळते. याशिवाय एक आणि दोन मृत्यू झाल्याची नोंदही अनेकदा झाली असून, आता करोनाचे बळी कमी झाल्याचे यातून दिसून येते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या