गोवेकरांनाही मोफत तीर्थ यात्रा घडवणार - केजरीवाल


पणजी

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवालांनी आता चांगलीच कंबर कसली आहे. सोमवारी गोव्यातील नागरिकांसाठी महत्वाची घोषणा करत ते म्हणाले की, आम आदमी पक्षाची गोवामध्ये सत्ता आली तर आम्ही हिंदुसाठी मोफत अयोध्या यात्रा आणि ख्रिश्चनांसाठी मोफत व्हॅटिकनची यात्रा करणार आहोत. तर मुस्लिमांसाठी अजमेर शरीफची मोफत यात्रा आणि साईबाबांची भक्तांसाठी शिर्डी यात्रा घडवणार आहोत.

केजरीवाल म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप हे एकत्रित मलई वाटून खाऊ अशा युतीवर काम करत आहेत. सत्तेत आल्यानंतर एकमेकांविरोधात कारवाई करायची नाही,असा काँग्रेस आणि भाजप पक्षांनी आपआपसात करार केला आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही भ्रष्ट पक्ष आहेत. त्यामुळेच काँग्रेसमध्ये भाजपविरोधात बोलण्याचे धाडस नाही. जर बोलले तर तुरुंगात पाठविण्यात येईल, अशी काँग्रेसला भीती आहे. भाजपची 10 वर्षे सत्ता असताना काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांवर एकही गुन्हा का दाखल झाला नाही?, असा केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान, 2022 मध्ये फेब्रुवारीत गोवा विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. नुकतेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी गोव्याचा दौरा केला आहे. आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या