एसटीकडून महिन्याला २१ कोटी रुपये भ्रष्टाचाराचा भाजपचा आरोप
मुंबई
एसटीकडून प्रत्येक प्रवाशावर एक रुपया कर आकारला जातो. एसटी प्रवाशांकडून महिन्याला २१ कोटी रुपये वसूल करत असते. हा सर्व पैसा ‘मातोश्री’त जातो, असा आरोप भाजपनेते गोपीचंद पडळकर यांनी केला.
राज्यामध्ये सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट केले. “एसटी महामंडळाकडून एक रुपया प्रत्येक प्रवाशावर कर आकारला जातो. एसटीने रोज ६५ लाख प्रवासी रोज प्रवास करत असतात. रोज ६५ लाख, महिन्याचे झाले किती? २१ कोटी. वर्षाचे झाले किती? पैसे जातात कुठे? हे पैसे मातोश्रीत जातात. एवढा हे भ्रष्टाचार करतात. कर्मचाऱ्यांना काहीच देत नाही,” असे ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांचा संपासंदर्भात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर देखील संप सुरूच असल्यामुळे अखेर एसटी महामंडळाने न्यायालयात संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात आणि कर्मचारी संघटनांविरोधात न्यायालय अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. असे असतानाच दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच पडळकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्याने भर पडणार आहे. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानात शेकडो आंदोलक जमले असून त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पडळकर यांनी एसटीतील भ्रष्टाचारावरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.
0 टिप्पण्या