पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

नगरसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना धोका


पुणे

शनिवारी नगरसह काही भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या २४ तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात बदल होत असतानाच कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असताना, त्यामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह दहा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. पुढील काही तासात या जिल्ह्यांमध्ये सुमारे ४० किमी प्रति तास वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. आज, रविवारी सकाळपासून या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून, गेल्या २४ तासात मुंबईत १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दि. ७ ते १० नोव्हेंबर या कालावधीत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगांच्या गडगडाट होण्याची शक्यता आहे. केरळ आणि माहेमध्ये उद्या सोमवारी पाऊस पडू शकतो, तर आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि यानाममध्ये सोमवारी आणि मंगळवारी पाऊस पडू शकतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या