हरणाच्या पाडसाला जीवदान


श्रीगोंदा प्रतिनिधी 

तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडला असला तरी वन्यजीवांना मात्र पाण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा वनवन करत असताना झालेल्या दुर्घटनामुळे अनेक वन्यजीवांना प्राणाला मुकावे लागत आहे. बुधवार दि. १७ रोजी श्रीगोंदा रेल्वे स्टेशनच्या जवळील वन विभागाच्या क्षेत्राला लागून असलेल्या विठ्ठल मारुती शिरसाठ या शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये हरणाचे पाडस पडले असल्याची माहिती वनरक्षक श्री नितीन डफडे यांना समजताच त्यांनी तात्काळ संघर्ष आदिवासी समाज संस्थेचे अध्यक्ष राहुल भोसले, अमोल भोसले यांच्याशी संपर्क करत घटनास्थळी तातडीने धाव घेतली. यावेळी अमोल भोसले यांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरले. विहिरीत पाणी कमी असले तरी साप, विंचू यांचा वावर होता. मात्र सर्व संकटाना तोंड देत तब्बल पाऊन तासाने त्या हरणाच्या पाडसाला बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले. आदिवासी समाजाने धाडसाने दाखवलेल्या सामाजिक जाणीवेमुळेच लहानग्या पाडसाला जीवदान मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याकामी वनरक्षक नितीन डफडे यांच्यासोबत संघर्ष आदिवासी समाज संस्थेचे राहुल भोसले, स्वप्निल पवार, अमोल भोसले व अतुल चव्हाण व शेतकरी निलेश शिंदे, अशोक शिरसाठ, विठ्ठल शिरसाठ यांनी यांनी अथक परिश्रम घेतले.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या