Breaking News

सोमय्याविरोधात काँग्रेस एक रुपयाचा दावा ठोकणार


मुंबई

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेसने दंड थोपटले आहे. आघाडीतील नेत्यांची बदनामी केल्या प्रकरणी काँग्रेस सोमय्या यांच्या विरोधात न्यायालयात एक रुपयांचा दावा ठोकणार आहे. 

भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे वारंवार काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. लोंढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो, असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात आता त्यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल करणार असून दोन कवडीचा दावा दाखल करता येत नाही म्हणून १ रुपयाचा दावा दाखल करणार आहे. सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात त्यांची असंबंध बडबड सुरू असते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून या बेताल बडबडण्याला चाप बसला पाहिजे म्हणून दिडदमडीच्या सोमय्यांची जेवढी लायकी आहे तेवढ्याच किमतीचा म्हणजे एक रुपयाचा दावा दाखल करणार आहे असेही लोंढे म्हणाले.


No comments