इतरांनी लस घेऊ नये असे मी म्हटले नाही

इंदुरीकर महाराजांचे स्पष्टीकरण


नगर

‘मी करोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही,’ असे वक्तव्य निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी नाशिक जिल्ह्यात बोलताना केले होते. त्यावर राज्यभर पडसाद उमटले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही याची दखल घेऊन ‘इंदुरीकरांचे प्रबोधन करू,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता स्वत: इंदुरीकरांनीची नगर तालुक्यातील एका कीर्तनातून भाष्य केले आहे. ‘मी लस घेतली नाही, घेणार नाही असे म्हणालो. परंतु इतरांनी लस घेऊ नये असे मी कुठेही म्हटलेले नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, सोशल मीडियातून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. ते म्हणाले, ‘दोन तासांच्या कीर्तनात एखादा शब्द चुकून जातो. तोच धागा पकडून स्वत:चा टीआरपी वाढविण्यासाठी मला लक्ष्य करतात’, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. विशेष म्हणजे कीर्तन सुरू असताना सुरू असलेले कॅमेरे त्यांनी बंद करायला लावले. त्यानंतरच पुढे कीर्तन सुरू केले.

‘मी करोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही,’ या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर नगर तालुक्यातील कौडगावमध्ये इंदुरीकर कीर्तनासाठी आले होते. यावेळी ते म्हणाले, ‘अनेक समाजप्रबोधनकारांनी समाज घडविणसाठी आपले जीवन वेचले. मात्र, सध्याच्या युगात गोड बोलून स्वार्थ साधणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मी वर्तमानकाळातील वास्तव सांगून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. यात अनावधानाने एखादा शब्द तोंडून निघाला तर तोच शब्द पकडून मला सोशल मीडियावर बदनाम केले जाते. दोन तासांच्या कीर्तनात मी चांगले बोललेले सोशल मीडियावर येत नाही, याची खंत वाटते. त्यामुळे खरे बोलणे आणि समाजापुढे वस्तुस्थिती मांडणे माझ्यासारख्या प्रबोधनकाराला आता चांगलेच महागात पडू लागले आहे. मात्र, मला कितीही बदनाम करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला तरीही मी माझे कार्य सोडणार नाही.’

तरुणांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, 'सध्या तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे आणि उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे तरुण दिशाहीन होत आहे. व्यसनापासून दूर रहा, गाव प्लास्टिक मुक्त करा, दररोज वृत्तपत्राचे वाचन करा आणि गावात वाचनालय सुरू करा. देवाच्या मंदिराइतकेच ज्ञानाच्या मंदिराला महत्त्व द्या तरच देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू शकतो.'


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या