नगराध्यक्षा शहा यांच्या माध्यमातून इंदापूरचा कायापालट : शकील सय्यद


इंदापूर  प्रतिनिधी

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे मत शहर भाजपचे अध्यक्ष शकील सय्यद यांनी व्यक्त केले. इंदापूर येथील अर्बन बँकेच्या सभागृहात (दि ३१) रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष सय्यद म्हणाले की, नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपरिषदेचे कामकाज पाच वर्ष चांगल्या पद्धतीने सुरू आहे. नगरपरिषदेच्या कामांबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाच वर्षात एकही आंदोलन केले नाही हे नगरपरिषदेच्या कामाचे यश आहे.

नगराध्यक्षा अंकिता शहा तसेच त्यांच्या सर्व टीमने इंदापूर शहराचा कायापालट करण्याचे काम या पाच वर्षाच्या कार्यकाळात केले. त्यामुळे इंदापूर शहरातील जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हाला साथ देईल. इंदापूर नगरपरिषदेला  देशपातळीवरील स्वच्छ व सुंदर इंदापूर बनवण्यासाठी उत्कृष्टपणे काम केल्याने अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे दोन वर्षापासून पदाधिकारी निवडी रखडल्या होत्या तरीदेखील पक्ष संघटनेचे काम शहरात मजबूत झालेले आहे असे मत यावेळी सय्यद यांनी व्यक्त केले.

आगामी होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष उत्कृष्ट कामगिरी करणार असल्याचे मत तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी व्यक्त केले. शहरापाठोपाठच तालुका कार्यकारणीची घोषणा लवकरच केली जाणार असून इंदापूर तालुक्यात ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक वातावरण तयार केले जाणार असल्याचे मत यावेळी जामदार यांनी व्यक्त केले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती वर सत्ता पुन्हा एकदा राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या