कोरोनावर लसच प्रभावी

फुप्फुसरोग तज्ज्ञांनी केला खुलासा


पुणे प्रतिनिधी

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधक लस हेच सध्या प्रभावी शस्त्र आहे. कोरोनाला प्रतिबंध केल्यास त्यापासून होणारा न्यूमोनियादेखील आपल्याला टाळणे शक्य असल्याचा विश्वास फुप्फुसरोग तज्ज्ञांनी शुक्रवारी व्यक्त केला.

न्यूमोनिया दिन जगभर शुक्रवारी साजरा झाला. त्यानिमित्ताने कोरोनामुळे होणाऱ्या न्यूमोनियाबद्दल जनजागृती करण्यासाठी फुप्फुसरोगतज्ज्ञांनी ही माहिती दिली. कोरोना हा आजार मूलतः फुप्फुस संबंधित आहे. त्यामुळे फुप्फुस हीच कोरोनाची युद्धभूमी आहे. कोरोनाचा विषाणू श्वसनमार्गातून किंवा तोंडाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर ते फुप्फुसात जातात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांना न्यूमोनिया होतो. हा न्यूमोनिया सामान्यतः होणाऱ्या न्यूमोनियापेक्षा वेगळा असतो.

विषाणू, जिवाणू, बुरशी अशा सूक्ष्म रोगजंतूच्या प्रादुर्भावामुळे न्यूमोनिया होतो. फुप्फुसातील वायुकोष्ठिकामध्ये सूक्ष्म रोगजंतू प्रवेश करतात. त्यामुळे रक्ताद्वारे ऑक्सिजन पुरवठ्याची, फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे रक्तात ऑक्सिजन मिसळण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या रोगजंतूंशी निकराने लढा देते. यातून फुप्फुसात द्रव पदार्थ तयार होतो. त्यामुळे ऑक्सिजन शोषून कार्बन डाय-ऑक्साईड बाहेर फेकण्याची क्रिया मंदावते. रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. दम लागतो आणि खूप खोकला येतो. त्याला वैद्यकीय परिभाषेत न्यूमोनिया म्हणतात

फक्त कोरोनामुळेच न्यूमोनिया होत नाही. तसेच, कोरोना झालेल्या प्रत्येकालाच तो होतो असेही नाही. त्यामुळे न्यूमोनिया नेमका कशामुळे झालाय याचे प्रयोगशाळेत अचूक निदान होते. गेल्या दीड वर्षांपासून आपल्याकडे कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. त्यामुळे कोरोना हेच बहुतांश रुग्णांमधील न्यूमोनियाचे कारण ठरत आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर ते फुप्फुसाकडे सरकू लागतात. त्यावेळी रुग्णाला ताप येतो. खोकल्याची प्रचंड ढास लागते. दम लागतो. श्वास घ्यायला त्रास होतो. याच वेळी रुग्णावर प्रभावी उपचार केल्यास कोरोनाच्या न्यूमोनियापर्यंत रुग्ण पोचत नाही. तो लवकर बरा होतो. त्यासाठी लक्षणे दिसताच लवकर उपचार घेणे आवश्यक असते.

कोरोनाच्या न्यूमोनियाला प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रतिबंधक लस. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि वारंवार हात स्वच्छ धुणे यातून कोरोनाला आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो.

- डॉ. नितीन अभ्यंकर, फुप्फुसरोगतज्ज्ञ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या