मुंबई
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये म्हणून भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवावित किंवा आवश्यक त्या दुरूस्त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.
मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघांच्याच मतदार याद्या महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशाच्या तशा वापरल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावांत किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कुठलीच कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे विधानसभेच्या मतदार यादीत नाव नसल्यास नावांची नोंदणी करणे, दुबार नावे वगळणे किंवा नावांतील अथवा पत्यांमधील दुरूस्त्या करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ही एक चांगली संधी आहे.
0 टिप्पण्या