देशमुखांच्या तुरुंगवासाची किंमत वसूल करू : शरद पवारांचा भाजपला इशारा


नागपूर

अनिल देशमुख यांना तुम्ही तुरुंगात टाकले आहे पण त्यांच्या तुरुंगातील प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची किंमत जनता तुमच्याकडून वसूल करणार आहे', असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केंद्र सरकार आणि भाजपला दिला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्यावरूनही पवार यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.

शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुधवारी नागपूर येथे त्यांचे आगमन झाले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तसेच अन्य कार्यक्रमांनाही हजेरी लावली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अटक आणि भाजपचं राजकारण यावर भाष्य केलं व भाजपला थेट शब्दांत इशारा दिला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवरून अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख यांना अटक दाखवण्यात आली आहे. देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याच संदर्भात शरद पवार बोलले. 'मी नागपुरात आलो आहे आणि अनिल देशमुख येथे नाहीत, असं प्रथमच घडलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्याने भाजपची मंडळी अस्वस्थ झाली असून सत्ता मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या मागे वेगवेगळ्या एजन्सीज लावण्यात आल्या आहेत. देशमुख यांची अटकही त्यातूनच झाली असून देशमुखांना तुम्ही तुरुंगात टाकलं असलं तरी तुरुंगातील त्यांच्या प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची किंमत जनता तुमच्याकडून वसूल करणार आहे', असा इशाराच पवार यांनी दिला. एखाद्या राज्यात सत्ता न मिळाल्यास केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

प्रफुल्ल पटेल यांनीही यावेळी महत्त्वाचे विधान केले. शरद पवार यांचे आशीर्वाद अनिल देशमुख यांच्यासोबत आहेत आणि पवारांच्या आशीर्वादाने देशमुख लवकरच तुरुगांबाहेर येतील, असे पटेल म्हणाले. हे माझे मत नाही तर शरद पवार यांचे मत असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या