फेडरेशनच्या मागणीला शरद पवारांचा सकारात्मक प्रतिसाद
कोपरगाव
महाराष्ट्रातील १६ हजारांवर पतसंस्थांच्या दोन कोटींपेक्षा जास्त ठेवीदारांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे, या मागणीचा प्रस्ताव घेवून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सहकारातील देशाचे नेते शरद पवार यांचेशी त्यांच्या बारामती येथे त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. सुमारे अर्धा तासाच्या या भेटीत त्यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दाखवली. राज्य व केंद्र शासनाशी या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खा. पवारांनी दिले असल्याची माहिती कोयटे यांनी 'राष्ट्र सह्याद्री'शी बोलताना दिली आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघ या संस्थेच्या अंतर्गत लिक्वीडीटी बेस प्रोटेक्शन फंड या योजनेद्वारे पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्यात यशस्वी झाले आहे. त्या धर्तीवर संपूर्ण राज्यात ही योजना चालू करण्याची मागणी नगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केली. या बाबत खा.पवार यांनी अनुकूलता दर्शविली आहे.
सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी पार्टीचे उपाध्यक्ष सांगलीचे सुरेश पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांचेसह बारामतीच्या माजी महापौर व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका भारती मुथा, उरुळी कांचन येथील मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
कोयटे म्हणाले, "महाराष्ट्रातील पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावे ही गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे. याबाबत एक प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र राज्य सहकरी पतसंस्था फेडरेशनने सहकार खात्याकडे दाखल केला आहे. परंतु या प्रस्तावास सहकार खात्याने अद्याप मान्यता दिलेली नाही. ही मान्यता मिळाल्यास महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण देण्यास सक्षम व सज्ज आहे. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सहकारी संस्था स्वायत्त असाव्यात या हेतूने पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचे काम सहकारी पतसंस्थांची स्वायत्त संस्था निर्माण करावी व यांस सहकार खात्याने व महाराष्ट्र शासनाने मान्यता द्यावी असे मत प्रगट केले आहे. दरम्यान खा.पवार हे सहकाराचे जाणकार नेते असल्याने महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री कोयटे यांनी शेवटी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या