Breaking News

चला आळंदीला जाऊ | ज्ञानदेव डोळा पाहू ||

कार्तिकी एकादशीनिमित्त अलंकापुरीत लाखो भाविक 


आळंदी : 

ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर या भावनेने राज्यभरातून आलेल्या असंख्य भाविकांमुळे अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी तहे सप्तशतकोत्तर रौप्य  महोत्सवी वर्ष असल्याने आळंदीत कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी हरिनामाने दुमदुमली. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी कार्तिकी यात्रा भरली नसल्यामुळे यंदा मात्र कार्तिकी यात्रेला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

काल रात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागल्यामुळे पश्चिमेकडील दर्शनमंडपातून येणारी दर्शनाची रांग कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान पूजेसाठी बंद ठेवण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास स्वकाम स्वयंसेवकांनी संपूर्ण देऊळवाडा स्वच्छ केला. घंटानाद झाल्यानंतर साडेबारा ते सव्वापर्यंत पवमान अभिषेक वेदमुर्ती प्रसाद जोशी आणि ११ ब्रम्हवृंद यांच्या हस्ते करण्यात आला.

सनई चौघड्याच्या मंजुळ स्वराने मंदिरातील वातावरण मंगलमय झाले होते. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. माऊलींच्या महापूजेला मानाचे वारकरी म्हणून जालना जिल्ह्यातील तालुका परतूर मधील परतवाडीचे वारकरी शेषेराव सोपान आडे (62) गंगुबाई सेशेराव आडे (60) या दांपत्याला मिळाला असुन त्यांनी व्याजाने पैसे घेऊन आपली आळंदीची कार्तिक वारी पूर्ण केली.

आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विकास ढगे यांच्या हस्ते मानाचे वारकरी,मानकरी आणि निमंत्रित मान्यवरांना नारळप्रसाद देण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे, यात्रा सभापती सचिन गिलबिले, माजी नगरसेवक डि.डि.भोसले पाटील, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, श्रींचे मानकरी योगिराज कु-हाडे, राहुल चिताळकर, योगेश आरू, अनिल कु-हाडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,श्रीधर सरनाईक आणि आळंदीकर बहुसंख्येने उपस्थित होते.सुमारे दोनच्या सुमारास माउलींच्या समाधी दर्शनासाठी दर्शनमंडपातील वारक-यांना खुले करण्यात आले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज श्रीक्षेत्र अलंकापुरी मध्ये नगरप्रदक्षिणा झाली.तसेच विविध दिंड्यांची सुध्दा नगरप्रदिक्षणा झाली.

Post a Comment

0 Comments