सर्वांगिण विकासामध्ये बापूंचे मोठे योगदान - खा. शरद पवार

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंचा पुतळा अनावरण 


लिंपणगाव  प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजसेवेसाठी शिवाजीराव नागवडे बापूंनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी दिलेले योगदान हे अविस्मरणीय असून,  राज्यात सहकार क्षेत्रात दिशादर्शक व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून बापूंचा परिचय  आहे. बापूंनी आपल्या कष्टातून उभारलेल्या या कामधेनूचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विसर पडता कामा नये, असे गौरवोद्गार देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे.

श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांच्या कारखाना कार्यस्थळावर उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खा शरद चंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंदिरा गांधी विद्या निकेतनच्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते.

यावेळी मार्गदर्शन करताना खा शरद चंद्र पवार म्हणाले की, शिवाजीराव नागवडे बापू हे एक जिद्दी व्यक्तिमत्व होते. एक छोटा खाजगी कारखाना प्रमुख कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सहकारी तत्त्वावर उभारला. तो काळ अत्यंत प्रतिकूल होता. हळूहळू हा कारखाना बापूंनी पाच हजार टनापर्यंत वाढवला. शेतकऱ्यांविषयी तळमळ असणाऱ्या या नेत्याने सहकार चळवळीच्या माध्यमातून भरीव काम केले  घोड कुकडीच्या पाण्यासाठी पाणी परिषद घेऊन या तालुक्याला सिंचनाची सोय केली. एवढ्यावरच बापू थांबले नाही तर कष्टकरी शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून खेडोपाडी या साखर कारखानदारीच्या माध्यमातून ज्ञान मंदिरे उघडली. या साखर कारखानदारीच्या माध्यमातून बापूंनी इथेनॉल व डिस्टिलरी सारखे प्रकल्प हाती घेतल्यामुळे कारखान्याला आर्थिक बळ मिळाले. तसेच कारखान्याने विज निर्मिती प्रकल्प उभारला. या प्रकल्पामुळे ऊस उत्पादकांना दीडशे ते दोनशे रुपये अधिक भाव देण्याचा प्रयत्न झाला.  सहकाराच्या सामुदायिक शक्तीमुळेच आज संपूर्ण महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती साधली गेली. त्यामध्ये नागवडे सुद्धा आघाडीवर होते. त्यामुळे ज्याला समाजसेवेचे कर्तुत्व आहे. त्या नेत्याचे अखंडपणे स्मरण होणे हे आपले सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. असे कर्तुत्व आपल्या कार्यातून शिवाजीराव नागवडे यांनी दाखवून दिले आहे.        

जलसंपदामंत्री ना जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारी ही दायित्व संस्था म्हणून जपली पाहिजे. कारखानदारी उभी करताना बापूंनी मोठे कष्ट घेतले. म्हणूनच श्रीगोंदा तालुक्यात ही सहकार चळवळ भक्कम पणे  उभी आहे. बापूंनी दिलेले योगदान हे सर्वांच्याच स्मरणात रहावे, म्हणून सभासदांनी बापूंचा पुतळा उभा केला निश्चितच हीच खरी बापूंना आदरांजली ठरेल.     

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात  राज्याचे महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात सहकार महर्षी बापू आहेत. त्याचे मुहूर्त स्वरूप आपण पुतळामध्ये दिलेले आहे. नगर जिल्हा खूप मोठा आहे .या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये इतर नेत्यांच्या बरोबरच शिवाजीराव नागवडे बापू यांचे देखील नाव अग्रेसर आहे. राज्यामध्ये अनेक सहकारी संस्था मोडीत आहेत. परंतु बापूंनी तालुक्यात उभारलेली ही सहकार चळवळ आज सक्षम पणे उभी आहे. याची कारणे कारभारात काटकसर, संस्था व सभासदांचे हित या बाबी बापूंनी कटाक्षाने हाताळल्यामुळेच राज्यात नागवडे कारखान्याचा नावलौकिक आहे. 

या सोहळ्यास राज्याचे महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात, जिल्ह्याचे पालकमंत्री ना हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री ना जयंत पाटील, ऊर्जा राज्यमंत्री ना  प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ,आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार बबनराव पाचपुते ,माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार आशितोाष काळे, आमदार निलेश लंके, आमदार अशोक  पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, चंद्रशेखर घुले ,आमदार राहुल जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय राव शेळके, राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंके ,बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, भगवानराव पाचपुते ,जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, दिपक शेठ नागवडे, पांडुरंग अभंग ,स्मितल वाबळे, दीपक पाटील भोसले, आदींसह जिल्ह्यातील आजी माजी आमदार, आजी माजी खासदार विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.   

प्रास्ताविक नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी केले. सूत्रसंचालन शशांक मोहिते व प्रा धर्मनाथ काकडे यांनी केले उपस्थितांचे आभार कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या