जिल्हा अधिकाऱ्यांच्या घरातून तब्बल दीड किलो सोने चोरी


पुणे प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर कॅडरचे आयएएस अधिकारी सागर डोईफोडे यांच्या पुण्यातील घरामधून चोरट्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल दीड किलो सोने आणि रोकड असा 44 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून पोलिसांना चोरट्यांचे सीसीटीवी फुटेज हाती लागले आहे. एकूण सहा चोरट्यांनी डोईफोडे यांच्या घरामध्ये चोरी केल्याचे दिसत आहे. पोलिसांना आरोपींचा माग काढण्यात यश आले असून मराठवाड्यातील एका जिल्ह्यातील लोकेशन पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दत्तात्रय संभाजी डोईफोडे (वय ६४, रा. ज्ञानेश्वरी बंगला, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय डोईफोडे हे महसूल विभागामध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करीत होते. ते निवृत्त आहेत. पत्नी व कुटूंबियांसह ते रहावयास आहेत. ड्रायव्हरअशोक रावसाहेब मोरे व सुरक्षा रक्षक शेषराव जालींदर वायकर हे त्यांच्या बंगल्यात रहावयास आहेत.

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या बंगल्यातील पहील्या मजल्यावर लक्ष्मीपुजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी लक्ष्मी पुजनामध्ये त्यांनी सोन्या चांदीचे व हिऱ्याचे दागिणे, व रोख रक्कम लक्ष्मी पुजनाच्या ठिकाणी ठेवून त्यांची पुजा केली होती. त्यानंतर बंगल्यासमोर फटाके वाजविले व नंतर सर्वजण एकत्र जेवण करुन बंगल्याचे गेट व दरवाजे बंद करुन रात्री साडे अकरा वाजता झोपी गेले. पहाटे चार वाजता डोईफोडे हे लक्ष्मी पुजनाच्या ठिकाणी गेले असता सोन्याचे दागिणे व रोख रक्कम दिसली नाही. म्हणून त्यांनी ड्रायव्हर अशोक मोरे, व सुरक्षा रक्षक शेषराव वायकर यांना आवाज देवून उठविले. त्यांच्याकडे दागिणे व रोख रक्कम याबाबत विचारणा केली असता त्यांनी, काहीही माहित नसल्याचे सांगितले. सर्वांनी बंगल्याची पाहणी केली असता बंगल्याच्या हॉलच्या खिडकीचा एक गज कापलेला दिसून आला. बंगल्याच्या गेटचे कुलूप गायब होते. बंगल्यात चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी पोलीसांना फोन करुन बोलावून घेतले.

चोरट्यांनी सोन्याचे हार, मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगड्या, पाटल्या, तोडे, अंगठ्या, सोनसाखळ्या, हिऱ्याचे दागिने, चांदीची भांडी असे वारसा परंपरेप्रमाणे स्त्रीधन असलेले सोन्याचे १५० तोळे वजनाचे दागिणे व अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या