खेड प्रतिनिधी । प्रभाकर जाधव
वाचन संस्कृती वाढविण्यात सिंहाचा वाटा असलेल्या दिवाळी अंकांची पूर्ण तयारी झाली असून, वाचकांना दिवाळी फराळाच्या मेजवानीबरॊबरच बौद्धिक व मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी बाजारात दिवाळी अंकांची रेलचेल झाल्याचे दिसून येत आहे.
मराठी माणूस व दिवाळी अंकाचे नाते खूप दृढ आहे. दिवाळीच्या सणांमध्ये अन्य वस्तूंबरोबरच दिवाळी अंकही आवर्जून खरेदी केले जातात. ज्यांना दिवाळी अंक खरेदी करणे शक्य नाही अगर कमीत कमी पैशात जास्तीत जास्त दिवाळी अंक वाचायचे आहेत असे वाचक लोक सार्वजनिक वाचनालये व ग्रंथालयातून दिवाळी अंक नेऊन वाचत असतात.
प्रामुख्याने दरवर्षीपेक्षा या वर्षी दिवाळी अंकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य, कथा-कादंबऱ्या, गुन्हेगारी, बाल, महिला, साहित्य, ज्योतिष, चित्र, नाट्य, कला, क्रीडा, अध्यात्म, धार्मिक, शेती, विनोद, पर्यटन, गुढकथा, रहस्यकथा, भविष्य, आदी अनेक विषयांवरील दिवाळी अंक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. यावर्षी विविध दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस कागदाच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे दिवाळी अंकांच्या प्रकाशन संस्थांना नाईलाजास्तव दिवाळीच्या अंकांच्या किमतीत काहीशी वाढ करावी लागत आहे. बरेचसे दिवाळी अंक हे दर्जामध्ये मात्र कोणतीही तडजोड करीत नसल्याचे दिसून येत आहे. हे विशेष आहे. सध्या असलेल्या दिवाळी अंकांपेक्षा अजून बरेचसे दिवाळी अंक बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती वृत्तपत्रविक्रेते पंढरीनाथ शिवले व सार्वजनिक वाचनालयाच्या सुप्रिया तपस्वी यांनी 'दै.राष्ट्र सह्याद्री' शी बोलताना सांगितले.
0 टिप्पण्या