श्रीरामपूरकरांनी जागविल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणी


श्रीरामपूर प्रतिनिधी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे परवा निधन झाले आणि एकोणीस वर्षांपूर्वी त्यांचे श्रीरामपूरमध्ये झालेल्या व्याख्यानाच्या आठवणींनी श्रीरामपूरकर गहिवरले . 24 जून 2002 रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय बाबुशेठ उपाध्ये यांच्या स्मरणार्थ श्रीराम तरुण मंडळातर्फे पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार कै.जयंत ससाणे यांनी भूषविले होते . त्याप्रसंगी शिवशाहीर पुरंदरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये वेळेचे महत्त्व उपस्थितांना विषद केले होते.

थोर विभूतींचे गुणगान करण्यापेक्षा त्यांचे गुण आपण आत्मसात करणे गरजेचे आहे . प्रत्येकाने वेळेचे महत्त्व पाळावे . नेताजी पालकर यांना एकदा उशीर झाला म्हणुन छत्रपतींनी त्यांना पदावरून हटवले असा इतिहास त्यांनी बोलून दाखवला होता . प्रत्येकाने जीवनामध्ये वेळेला महत्त्व द्यावे असे मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले होते आणि त्याला कारणही तसेच घडले होते . त्या व्याख्यानाची वेळ सायंकाळी सहा वाजता होती . शिवशाहीर पुरंदरे यांचे आगमन बरोबर सहा वाजता पालिकेच्या गेट समोर झाले. आमदार जयंत ससाणे,

श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, उपनगराध्यक्षा काशिबाई डावखर,अनिल कांबळे,सलीमखान पठाण, संजय छल्लारे, सुरेश सोनवणे आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी सभागृहामध्ये जेमतेम उपस्थिती होती. काही वेळ नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये बसावे असे त्यांना सांगण्यात आले. मात्र त्यांनी ते न ऐकता तडक व्यासपीठाकडे प्रयाण केले. मी वेळ पाळणारा माणूस आहे. दिलेली वेळ कधी टाळत नाही असे सांगून त्यांनी व्यासपीठावर बसणे पसंत केले. ते स्वतः व्यासपिठावर आल्यामुळे संयोजकांना कार्यक्रम सुरू करावा लागला. कार्यक्रम सुरू झाल्याचे कळताच नागरिकांनी सभागृहात गर्दी केली आणि काही वेळाने सभागृह हाऊसफुल्ल झाले. व्याख्याना नंतर अनेकांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली होती. श्रीराम तरुण मंडळाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले होते.त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नेते सलीमखान पठाण यांनी उत्कृष्ट प्रकारे केल्याबद्दल शिवशाहीर पुरंदरे यांनी त्यांचे खास अभिनंदन देखील केले होते. या सर्व आठवणी पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच श्रीरामपूरकरांनी जागवल्या. श्रीराम तरुण मंडळातर्फे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या