तपासात निष्पन्न : पोलीस निरीक्षक संपत शिंदे याची माहिती
नगर
डिझेलची दरवाढ झाल्यानंतर जैवइंधन अवैधरित्या विक्रीचे प्रकार वाढले आहेत. अहमदनगर शहरालगत पोलीस आणि पुरवठा विभागाने अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. आरोपींना अटक करून मुद्देमालही जप्त केला. आता याप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली असून शिवसेनेचे शहर प्रमुख आणि केडगावमधील हॉटेल व्यावसायिक दिलीप सातपुते या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस सातपुते यांचा शोध घेत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली.
गेल्या महिन्यापासून बायोडिझेलच्या अवैध विक्रीचे प्रकार उघडकीस येत आहेत. पोलिसांनी केडगाव तसेच सोलापूर रोडवरही छापे घालून कारवाई केली. यात बायोडिझेल विक्री करणारे, विकत घेणारे ट्रकचालक यांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडू लाखो रुपयांचा माल जप्त केला. ऑक्टोबर महिन्यात केडगावमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्याचा कोतवाली पोलीस तपास करीत आहेत. यात आतापर्यंत दहा जणांना पोलिसांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी माहिती आणि आरोपींची नावे पोलिसांना मिळाली. त्यातूनच याचा सूत्रधार सातपुते असल्याचे पुढे आले. नाव निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी शोधशोध सुरू केली आहे. मात्र, याची कुणकुण लागल्याने सातपुते सध्या बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी अटकेसाठी पथके नियुक्त करून तपासासाठी रवाना केली आहेत.
शहर प्रमुखाचा संबंध अवैध बायोडिझेल विक्री प्रकरणाशी असल्याचे पुढे आल्याने आता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. सातपुते स्थानिक शिवसेनेचे आक्रमक पदाधिकारी समजले जातात. माजी आमदार अनिल राठोड यांच्या मर्जीतील असल्याने त्यावेळी त्यांना हे पद मिळाले होते. नगर शहरात शिवसेनेत दोन गट आहेत. त्यातील एक गट राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि भाजपशीही जुळवून घेणारा मानला जातो. तर सातपुते यांचा दुसरा गट राष्ट्रवादीचा कट्टर विरोधक मानला जातो. त्यामुळे स्थानिक पातळीवरील अन्य राजकीय नेत्यांची भूमिकाही यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे.
0 टिप्पण्या