सभापतीपदी लहू शेलार बिनविरोध


भोर
 

तालुका पंचायत समिती सभापती दमयंती जाधवांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य श्रीधर किंद्रे आणि मंगल बोडके यांचे पक्षादेश (व्हीप) डावलल्याप्रकरणी सदस्यत्व रद्द झाल्याने आज (दि.१६) पंचायत समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे लहू शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पंचायत समिती सभागृहात सकाळी १० वा.निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.विद्यमान उपसभापती लहू शेलार यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासन अधिकारी प्रांत राजेंद्र कचरे यांनी त्यांची निवड घोषित केली.पंचायत समिती मधील काँग्रेसचे रोहन बाठे हे सूचक झाले तर शिवसेनेच्या पूनम पांगारे यांनी पाठिंबा दिला.तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सदस्य सध्या पंचायत समितीमध्ये असल्याने कोण कोणास मदत करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र तिन्ही सदस्यांनी सामंजस्याने निर्णय घेतल्यामुळे पंचायत समिती बरखास्त होण्यापासून वाचली आहे.

 .....तर पंचायत समिती बरखास्त झाली असती. 

सभापतीपदासाठी दोन सदस्यांनी हातमिळवणी केली असती आणि तिसऱ्या सदस्यांने राजीनामा दिला असता तर पंचायत समिती बरखास्त झाली असती.सध्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस १, शिवसेना १,राष्ट्रवादी काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या