चौकशीविना हिंसाचाराचे उत्तरदायित्व नाही : गृहमंत्री


नागपूर

त्रिपुरातील कथित व्हिडीओमुळे अमरावती, नांदेड, मालेगांव येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी रजा अकादमीवर बंदी घालण्याच्या मागणीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी उत्तर देताना चौकशीविना कुणालाही उत्तरदायी ठरवता येणार नाही असे उत्तर दिले.

मात्र याप्रकरणी भाजपाकडून रझा अकादमीच्या चौकशीची मागणी केली असता त्यांनी अकादमीच्या चौकशीची मागणी थेट फेटाळून लावत दंगलीची चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत चौकशीशिवाय कोणालाही उत्तरदायी ठरविता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड, अमरावती आणि मालेगाव येथे घडलेल्या घटनांच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. राज्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. चौकशीनंतर ज्या गोष्टी पुढे येतील त्यावरून पुढील निर्णय घेण्यात येईल. चौकशीविना कुणालाही उत्तरदायी ठरवता येणार नाही, अशी राज्यातील दंगल परिस्थितीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.

नांदेड, मालेगांव शहरात एकादाच मोर्चा काढत सदर व्हिडिओचा निषेध करण्यात आला. मात्र अमरावतीमध्ये मुस्लिम समुदायाने काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून हिंदूनी काढलेल्या मोर्चाच्यावेळी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्याचे पहायला मिळाले. तसेच या हिंसाचाराच्या वेळी भाजपाचे माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांची विचारपूस करत पोलिसांशी वाद घातल्याचे दिसून आल्याचे त्यांच्या ट्विटरवरील अकाऊंटवर प्रसिध्द केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या